कोरोना महामारीमुळे देशात आतापर्यंत लाखो लोकांनी आपला जीव गमावला आहे. अनेक कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे त्यांना आर्थिक स्तरावर कठीण आव्हानांचा सामना करावा लागत आहे. यापैकी अनेक कुटुंबे आहेत ज्यात मृत व्यक्तींनी गृहकर्ज किंवा क्रेडिट कार्डचे देणे भरले नाही. आता बँकेची ही थकबाकी कोण भरणार हा मोठा प्रश्न या अनेकांच्या मनात असतो. उरलेल्या कर्जाची परतफेड उत्तराधिकार्याने करावी की आणखी काही नियम आहे?
बँक किंवा इतर संस्थांमध्ये कर्ज घेणार्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, ते कसे दिले जाईल हे मुख्यतः कर्जाच्या कॅटगरीवर अवलंबून असते. गृहकर्जामध्ये, वैयक्तिक कर्जासाठी यासाठीचे नियम वेगळे असतात, तसेच प्रक्रियाही वेगळ्या पद्धतीने केली जाते. तज्ज्ञांच्या मते, गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या बाबतीत वसुली करणे सोपे असले तरी वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्ड कर्जाच्या बाबतीत वसुली करणे थोडे कठीण आहे.
गृहकर्जाची मुदत साधारणपणे जास्त असते. ही कर्जे देताना बँका त्याची रचना अशी ठेवतात की कर्जदाराच्या अपघाती मृत्यूनंतरही वसुलीवर परिणाम होत नाही. अशा बहुतेक प्रकरणांमध्ये, कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य असलेल्या सह-अर्जदाराचीही तरतूद आहे. कर्जदाराच्या मृत्यूनंतर, कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी सह-अर्जदाराची असते. याशिवाय अनेक बँकांमध्ये कर्ज घेताना विमा काढला जातो आणि जर व्यक्तीचा मृत्यू झाला तर बँक विम्याच्या माध्यमातून त्याची वसुली करते. म्हणून, जेव्हाही तुम्ही कर्ज घेता तेव्हा तुम्ही बँकेला या विम्याबद्दल विचारू शकता. याशिवाय त्यांना मालमत्ता विकून कर्ज फेडण्याचा पर्यायही दिला जातो. तसे न झाल्यास, बँक सरफेसी (Sarfaesi) कायद्यांतर्गत कर्जाच्या बदल्यात ठेवलेल्या मालमत्तेचा लिलाव करते आणि त्यातून कर्जाची थकबाकी वसूल करते.
वैयक्तिक कर्जाबद्दल बोलायचे तर, ही सुरक्षित कर्जे नसतात आणि असुरक्षित कर्जाच्या कॅटगरीत ठेवली जातात. वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्ड कर्जाच्या बाबतीत, बँका मृत्यूनंतर दुसऱ्या व्यक्तीकडून पैसे वसूल करू शकत नाहीत. तसेच वारस किंवा कायदेशीर वारसाला हे कर्ज फेडण्याची सक्ती करता येणार नाही. अशा परिस्थितीत, व्यक्तीच्या मृत्यूनंतर, हे कर्ज राइट ऑफ केले जाते म्हणजेच सवलत खात्यात टाकले जाते.