पैसे पाठवण्यापासून ते रेल्वेप्रवास करण्यापर्यंत, आजपासून तुमच्या आयुष्यात होणार महत्त्वाचे 5 बदल
01st December 2020: आज 1 डिसेंबर 2020 पासून सामान्य माणसाच्या आयुष्याशी संबंधित काही महत्त्वाच्या नियमात बदल होत आहेत. यामध्ये RTGS, रेल्वे आणि गॅस सिलेंडरसंबंधित काही गोष्टींमध्ये बदल होत आहेत.


आज 1 डिसेंबर 2020 पासून सामान्य माणसाच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल होणार आहत. यामध्ये नेट बँकिंगच्या माध्यमातून फंड ट्रान्सफर करण्यापासून ते एलपीजी, इन्शूरन्ससह एकूण 5 बदलाचा समावेश आहे, जाणून घ्या सविस्तर


RTGS सुविधा- आजपासून फंड ट्रान्सफर करण्याच्या एका महत्त्वाच्या नियमात बदल करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) 24x7x365 उपलब्ध करण्याची घोषणा केली होती. अर्थात RTGS च्या माध्यमातून 24 तासात कधीही तुम्हाला पैसे ट्रान्सफऱ करता येतील. सध्या महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सोडून सर्व कामकाजाच्या दिवसात सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत RTGS सिस्टिममधून फंड ट्रान्सफर करता येत असे.


PNB च्या पैसे काढण्याच्या नियमात बदल- देशातील दुसरी मोठी सरकारी बँक असणाऱ्या पंजाब नॅशनल बँक (PNB) 1 डिसेंबर पासून एटीएम (ATM) मधून पैसे काढण्याच्या नियमात आजपासून काही बदल करत आहे. बँक वन टाइम पासवर्ड आधारित कॅश विड्रॉल प्रणाली सुरू करणार आहे. 1 डिसेंबरपासून PNB 2.0 अंतर्गत ही नवी सुविधा सुरू करण्यात येणार आहे. याकरता तुम्हाला एटीएम मधून पैसे काढण्यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी द्यावा लागेल. 1 डिसेंबरपासून रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत PNB 2.0 ATM मधून एकाच वेळी 10000 रुपयापेक्षा जास्त रक्कम काढण्याची प्रक्रिया ओटीपी बेस्ड असेल. अर्थात नाइट आवर्समध्ये 10000 रुपयापेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर PNB ग्राहकाना OTP आवश्यक असेल. त्यामुळे या वेळेत ATM मध्ये जाताना तुमचा मोबाइल बरोबर घेऊनच जा.


प्रीमियममध्ये करता येईल बदल- आता पाच वर्षानंतर विमाधारक प्रीमियमची रक्कम 50 टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो. अर्थात विमाधारक निम्म्या हप्त्यातही पॉलिसी सुरू ठेवू शकतो.


1 डिसेंबरपासून धावणार काही नवीन रेल्वेगाड्या- भारतीय रेल्वेच्या काही नवीन गाड्या आजपासून धावणार आहेत. कोरोना संकटापासून रेल्वे काही स्पेशल ट्रेन चालवत आहे. आता 1 तारखेपासून काही नवीन रेल्वेसेवा सुरू होत आहेत. यामध्ये पंजाब मेल आणि झेलम एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. सामान्य श्रेणीअंतर्गत या दोन्ही ट्रेन धावणार आहेत. 01077/78 पुणे-जम्मूतवी पुणे झेलम स्पेशल आणि मुंबई फिरोजपुर पंजाब मेल स्पेशल दररोज धावणार आहे.