रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण समितीच्या बैठकीत झालेल्या मोठ्या निर्णयांची घोषणा केली. यात आरबीआय क्यू आर कोड आधारित वेंडिंग मशिनचा पायलट प्रोजेक्ट लाँच करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नाण्यांची उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
शक्तिकांत दास म्हणाले की, या मशिन्सचा वापर युपीआयच्या माध्यमातून केला जाईल आणि मशिनमधून बँक नोटांच्या जागी नाणी निघतील.
आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पहिल्या पतधोरण भाषणात रेपो रेटला ०.२५ टक्के वाढवण्याची घोषणा केली. सलग सहाव्यांदा आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. रेपो रेट आता ६.५० टक्क्यांवर पोहोचला हे.
रेपो रेट वाढवल्याने बँकांचे कर्ज आणखी महाग होण्याची शक्यता आहे. ज्या लोकांवर आधीपासून कर्ज आहे त्यांच्या कर्जाचे हफ्ते महाग होतील. आरबीआयने म्हटलं की, पतधोरण समितीच्या बैठकीत ६ पैकी ४ लोकांनी रेपो रेट वाढवण्याच्या बाजूने मत दिलं.
आर्थिक वर्ष २०२३ साठी सीपीआय आधारीत महागाई दर ६.५ टक्के राहण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण ६.७ टक्के होतं.
तर पुढच्या वर्षात ते ५.३ टक्क्यांवर येईल अशी अपेक्षा आरबीआयने व्यक्त केलीय. रब्बी हंगामात चांगले उत्पादन झाल्यामुळे खाद्यपदार्थांच्या किंमती कमी होतील असं म्हटलं आहे.
भारताच्या विकास दराबाबत शक्तिकांत दास म्हणाले की, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारताचा जीडीपी ६.४ टक्के राहील असा अंदाज आहे. एप्रिल-जून २०२३ च्या तिमाहीत तो ७.८ टक्क्यांवर पोहोचेल. याशिवाय जुलै सप्टेंबरमध्ये ६.२ तर जानेवारी-मार्च २०२४ पर्यंत तो ५.८ टक्क्यांवर जाईल.
शक्तिकांत दास यांनी म्हटलं की, भारतीय रुपया इतर आशियाई चलनाच्या तुलनेत जास्त स्थिर राहिला आहे. जागतिक अर्थव्यवस्था आधीच्या काही महिन्यांच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहे. मात्र अनेक देशांमध्ये महागाई दर हा अजुनही त्यांच्या ध्येयाच्या बाहेर आहे.