प्रसिद्ध उद्योगपीत हर्ष गोयंका यांनी एक ट्वीट करत म्हटलं की, 'दुबईतील सुंदर घर जे अब्जाधीशाने विकत घेतले आहे.' मात्र या ट्वीट नंतर ते अब्जाधीश कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानींनी दुबईतील सर्वात महागडे घर खरेदी केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी जे घर खरेदी केल्याचा दावा केला जात आहे, त्याची किंमत 80 दशलक्ष डॉलर म्हणजे 639 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
मुकेश अंबानी यांनी हे घर त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीसाठी विकत घेतल्याचे बोलले जात आहे. या डीलशी संबंधित लोकांवर विश्वास ठेवला तर हे दुबईतील आतापर्यंतचे सर्वात महागडे घर आहे. बीचवर बांधलेल्या या आलिशान व्हिलामध्ये सर्व प्रकारच्या लक्झरी सुविधा उपलब्ध आहेत. हे आलिशान 7 स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही.
रिपोर्ट्सनुसार, पाम जुमेरा बीचवर असलेली ही प्रॉपर्टी या वर्षाच्या सुरुवातीला खरेदी करण्यात आली होती. या मालमत्तेशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे की सध्या अंबानी या व्हिलाला दुरुस्त करण्यासाठी आणि तिची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी लाखो डॉलर खर्च करतील.
आलिशान व्हिला समुद्रकिनाऱ्याच्या काठावर वसलेला आहे. हा व्हिला इतका आलिशान आहे की तो दुरूनच सर्वांना आकर्षित करतो. यात सर्व प्रकारच्या सुविधा आहेत.
या व्हिलामध्ये 10 बेडरूम आहेत. व्हिलामध्ये इनडोअर आणि आउटडोअर स्विमिंग पूल आणि स्पा उपलब्ध आहेत. येथे खेळासाठीही भरपूर जागा आहे. जिम व्यतिरिक्त एक खाजगी थिएटर देखील आहे.
दुबई सरकारने दीर्घकालीन गोल्डन व्हिसा देऊन जगभरातील श्रीमंत लोकांना येथे राहण्यासाठी प्रेरित केले आहे. अंबानी यांच्याआधी शाहरुख खान आणि ब्रिटीश फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम यांनीही येथे प्रॉपर्टी खरेदी केली आहे.