मुंबई : पीएम किसान सन्मान निधीसोबतच एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड आहे. याचा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो. हे किसान क्रेडिट कार्ड नक्की काय असतं? त्याचा फायदा शेतकऱ्यांना कसा घेता येतो त्याची सुरुवात कधी झाली याबद्दल जाणून घेऊया.
किसान क्रेडिट कार्ड योजना नेमकी काय? किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड देण्यात येणार आहे. ज्याद्वारे त्यांना 1 लाख 60 हजारांचं कर्ज दिलं जातं. या कर्जाच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना आपल्या शेतीची अधिक चांगली काळजी घेता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही आपल्या पिकांचा विमा उतरवता येणार आहे.
हे क्रेडिट कार्ड कसं मिळवू शकता? - किसान क्रेडिट कार्ड 2023 अंतर्गत, आपण दोन प्रकारे ऑनलाइन अर्ज करू शकता, बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता, दुसरे म्हणजे पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपण अर्ज करू शकता.
किसान क्रेडिट कार्ड योजना कधी सुरू झाली? - किसान क्रेडिट कार्ड योजना १९९८ मध्ये सुरू झाली. कापणीनंतरचा खर्च भागविण्यासाठी शेतकरी कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी आणि कृषी मालमत्तेच्या देखभालीसाठी शेतकऱ्यांना पैसे मिळावेत आणि पैशांची उलाढाल व्हावी या उद्देशानं ही योजना सुरू करण्यात आली.
किसान क्रेडिट कार्ड हे बँकेच्या क्रेडिट कार्डसारखंच असतं का? - कमी व्याजदरात शेतकऱ्यांना यावर कर्ज मिळतं. हे कर्ज शेतकऱ्याला हळूहळू दिलेल्या मुदतीमध्ये फेडावं लागतं. हे सामान्य क्रेडिट कार्डपेक्षा वेगळं आहे. यासाठी काही सोप्या अटींवर हे कार्ड दिलं जातं.
किसान क्रेडिट कार्ड कोणाला घेता येतं? - याला ग्रामीण भागात ग्रीन कार्ड असंही म्हणतात. ज्यांच्याकडे स्वत:ची जमीन आहे आणि जे शेतकरी आहेत ज्यांचं उत्पन्न शेतीवर अवलंबून आहे अशा शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येतो. यावर शेतकऱ्यांना लोनही मिळतं.
किसान क्रेडिट कार्डवर किती पैसे मिळतात? किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना कमी दरात कर्ज दिले जाते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे १ लाख ६० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय उपलब्ध आहे. आता ही योजना पंतप्रधान किसान सन्मान निधीशीही जोडली गेली आहे