1 मार्चपासून अनेक नवीन बदल होत आहेत. यामध्ये सर्वसामान्य ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. याचं कारण म्हणजे महागाईच्या झळा आता आणखी तीव्र बसणार आहेत. गॅस सिलिंडर पाठोपाठ आता बँकांनी कर्जही महाग केलं आहे. त्यामुळे खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.
HDFC आणि PNB ने त्यांच्या ग्राहकांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. HDFC लिमिटेड आणि सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँक या दोन्ही बँकांनी त्यांच्या कर्जाचे दर वाढवले आहेत.
दोन्ही बँकांनी मंगळवारी 0.25 टक्क्यांपर्यंत वाढीची घोषणा केली. १ मार्चपासून सुधारित दर लागू होतील. यामुळे नवीन आणि जुन्या ग्राहकांसाठी होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन महाग होणार आहे.
HDFC ने याबाबत एक निवदेन दिलं आहे. आपल्या मुख्य कर्ज दरात 0.25 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. प्राइम रिटेल कर्जाचा दर 9.20 टक्के झाला आहे.
PNB ने MCLR वर आधारित दर 0.10 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली. ही वाढ सर्व मुदत कर्जांवर लागू होईल.
महिन्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेने पॉलिसी व्याजदर रेपोमध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ केली होती. यासह रेपो रेट 6.25 टक्के झाला आहे.