ऑगस्ट 2020 मध्ये कोरोनाच्या काळात सोन्याचे दर सर्वोच्च पातळीवर होते. आता सोन्याने हा रेकॉर्डही मोडला आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव वाढून 56,236 रुपये झाला आहे.
99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅममागे 121 रुपयांची वाढ झाली आहे. एक दिवस आधी हा भाव 56,115 रुपये प्रति दहा ग्रॅम होता.
शुक्रवारी चांदीचा भाव 145 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला आहे. एक किलो चांदीचा भाव 68,729 रुपये इतका खाली आला आहे.
कॉमेक्सवर सोन्याचे दर 1,898 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. तिथे सोन्याच्या भावाने 9 महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. चांदीचे दर 23.73 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत.
मोतीलाल ओसवाल यांच्या वरिष्ठ व्हीपी (कमॉडिटी रिसर्च) नवनीत दमानी सांगतात की, अमेरिकेतील महागाईची आकडेवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली. अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्ह व्याजदरात 0.25 टक्क्यांनी वाढ करू शकते, असा विश्वास बाजारात व्यक्त केला जात आहे. या अहवालांनंतर अमेरिकन डॉलरमध्ये घसरण झाली, त्यानंतर सोन्याच्या किंमती वाढल्या.
कॉमेक्सवर सोन्याचा भाव 1900 डॉलर प्रति औंसच्या पुढे गेला. मात्र, भारतात सोन्याचे दर फार वेगाने वाढण्याची शक्यता नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण डॉलर कमजोर झाल्यामुळे रुपया मजबूत होईल. अशात आगामी काळात सोन्याच्या दरात फारशी झपाट्याने वाढ होताना दिसत नाही.