मुंबई : तुम्ही जर गुंतवणुकीला अजूनही सुरुवात केली नसेल तर तुमच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या सुरक्षित भविष्यासाठी नव्या वर्षात चांगल्या गुंतवणुकीचा संकल्प करा. तुमच्या पगारातून टॅक्स जाऊ नये आणि योग्य आणि चांगली गुंतवणूक व्हावी यासाठी आज आम्ही तुम्हाला काही उत्तम पर्याय सुचवणार आहोत.
या सरकारी स्कीम तुम्हाला चांगल्याच फायद्याच्या ठरतील. कारण या स्कीमला करामध्ये सूट देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही जर यामध्ये गुंतवणूक केली तर तुमचा मोठा फायदा होऊ शकतो.
PPF - ही गुंतवणूक तुम्ही नोकरीला लागलेल्या दिवसापासून देखील करू शकता. यामध्ये तुम्हाला कमीत कमी 1000 ते जास्तीत जास्त दीड लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करता येते. यावर सरकारकडून 7.1 टक्के व्याजदर देखील दिलं जातं. आयकर भरताना कलम 80C अंतर्गत यामधून सूट दिली जाते. त्यामुळे तुम्ही जर यामध्ये गुंतवणूक सुरू केली तर तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो.
म्युच्युअल फंड- इक्विटी लिंक सेविंग स्कीम सारख्या योजनांना देखील सेक्शन 80C अंतर्गत सूट दिली जाते. या स्कीमला टॅक्स सेविंग स्कीम असंही म्हटलं जातं. यामध्ये 1.5 लाखापर्यंत गुंतवणूक करुन तुम्ही टॅक्समधून सूट मिळवू शकता. त्यावर जर रक्कम गेली तर मात्र तुम्हाला टॅक्स भरावा लागू शकतो.
NPS- या योजनेमध्ये तुम्ही अगदी नोकरीला लागल्यापासून पैसे ठेवू शकता. सीसीडी (1) अंतर्गत 1.5 लाख सीसीडी (1बी) अंतर्गत 50,000 रुपयांची सूट मिळते.
सुकन्या समृद्धी योजना- जर तुमच्या घरात मुलगी असेल तर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. त्यासाठी तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेच्या वेबसाईटवर किंवा बँकेत यासंबंधित अधिक माहिती मिळू शकते.
इंश्युरन्स प्लॅन- जीवन आणि आरोग्य विम्यात गुंतवणूक करणे ही एक सुरक्षित योजना मानली जाते. हे आपल्या मालमत्तेचे अनपेक्षित नुकसान होण्यापासून संरक्षण करते. या पॉलिसीसाठी भरलेल्या प्रीमियमवर तुम्हाला करातून सूट मिळू शकते. याचा तुम्हाला आयकर वाचवण्यासाठी देखील फायदा होऊ शकतो.