सप्टेंबर 2019 पासून बँकेशी संबंधित काही नियम बदलणार आहेत. एका बाजुला घर खरेदीसाठी कर्ज स्वस्तात उपलब्ध करून दिलं जात आहे तर दुसरीकडं बँकेची वेळही बदलणार आहे. याशिवाय बँकेच्या आणखी काही नियमांमध्ये बदल होणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियानं गृहकर्ज स्वस्तात उपलब्ध करून दिलं आहे. त्यांनी गृह कर्जाच्या दरात 0.20 टक्क्यांनी घट केली आहे. 1 सप्टेंबरपासून हा नियम लागू करण्यात येणार आहे.
सरकारी बँकेकडून 1 सप्टेंबरपासून 59 मिनिटांत कर्ज उपलब्ध होणार आहे. यामध्ये गृहकर्ज, वाहन कर्जाचा समावेश आहे. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सने 'psbloansin59minutes' वर ही सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
मोबाईलवरून पेटीएम, फोन पे, गुगल पे वापरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत केवायसी पूर्ण करणे गरजेचं आहे. ते केलं नाही तर 1 सप्टेंबरपासून तुमचं मोबाईल वॉलेट बंद होईल. रिझर्व बँक ऑफ इंडियाने यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती.
बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्जही स्वस्त होणार आहे. त्यांनी रिटेल लोनला रेपो रेटशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं ज्या ज्या वेळी आरबीआय रेपो रेटमध्ये बदल करेल तेव्हा कर्जाच्या व्याज दरातही बदल होईल.
केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी बँकेमधून किसान क्रेडिट कार्ड 15 दिवसांत तयार करून देण्याचे आदेश दिले आहेत. 1 सप्टेंबरपासून या आदेशाची अंमलबजावणी होणाह आहे. यामुळं किसान क्रेडिट कार्ड लवकर मिळेल.
एसबीआयनं रिटेल फिक्स्ड डिपॉझिट आणि बल्क डिपॉझिटच्या व्याज दरात कपात केली आहे. 1 लाख रुपयांपर्यंत डिपॉझिट करणाऱ्या ग्राहकांना 3.5 टक्के व्याज मिळेल तर त्यापेक्षा जास्त रकमेवर 3 टक्के व्याज मिळेल. बँकेनं रिटेल टर्म डिपॉझिटच्या दरात 0.1 टक्के ते 0.5 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे तर बल्क डिपॉझिट रेटमध्ये 0.3 टक्के ते 0.7 टक्के कपात केली आहे.
बँकेच्या कामकाजाचा वेळ सध्या सकाळी 10 वाजता आहे. मात्र आता ही वेळ बदलण्याची शक्यता आहे. सकाळी 9 वाजता बँक उघडण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयानं दिला आहे. जर हा नियम लागू झाला तर सकाळी ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे बँकेतील काम आटोपून जाता येईल.