विसाव्या शतकातील महामानव आणि सत्य, अहिंसा, सत्याग्रहाच्या मार्गाने भारतीय स्वातंत्र्यलढ्यात प्राण फुंकणारे अग्रगण्य नेते म्हणून महात्मा गांधीची ओळख आहे.
भारतासारख्या देशाने महात्मा गांधी ही अमूल्य भेट जगाला दिली आहे. जगात सर्वाधिक पुतळे गांधीजींचे आहेत. गांधी ज्या ब्रिटिशांच्या साम्राज्यवादा विरोधात लढले त्याच इंग्लडमध्ये त्यांचा पुतळा आहे.
महात्मा गांधी यांचा वर्धा येथील सेवाग्राम आश्रम देशासाठीच नव्हे तर जगासाठी प्रेरणास्थान आणि ऊर्जास्थान बनलेला आहे.
सध्याच्या धकाधकीच्या आणि अविश्वासाच्या दुनियेत गांधीजी हाच एकमेव आधार असल्याचे अभ्यासकांकडून सांगण्यात येते.
आज गांधीजी नसले तरी त्यांच्या आश्रमाला भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक, अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते येत असतात.
आपल्या पाल्यांच्या आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी आश्रम पाहायला आणि समजून घ्यायला येत असतात. पर्यावरण, सामाजिक प्रश्न घेऊन निघणारे यात्रेकरूही आवर्जून नतमस्तक होण्यास येतात.
सेवाग्राम आश्रम आजही त्याच सुस्थितीत असून दैनंदिन कार्यक्रम सुरू आहेत. याच परिसरात नित्यनेमाने कार्यशाळा, संमेलने, प्रशिक्षण कार्यक्रम होत असतात. यातून प्रेरणा आणि ऊर्जा मिळावी हाच उद्देश आहे.
एप्रिल 2022 ते मार्च 2023 या आर्थिक वर्षात तब्बल 2 लाख 26 हजार 355 पर्यटक, अभ्यासकांनी सेवाग्राम आश्रमाला भेट दिली.
छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसया ऊईके, महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, फिजीचे राजदूत कमलेश स्वरूप, लोकसभा खासदार शशी थरूर आदींनी आश्रमाला भेट दिली.
महात्मा गांधीजींच्या नात सुमित्रा गांधी कुळकर्णी व तारा गांधी भट्टाचार्य यांसह अन्य लोकांच्या नोंदी आश्रमात करण्यात आल्या आहेत. दररोज आश्रम परिसरात नागरिक गर्दी करीत आहे.
महात्मा गांधी यांचं वास्तव्य असणाऱ्या वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमाला एकदा तरी अवश्य भेट दिली पाहिजे, असं हे ठिकाण आहे.