महाराष्ट्राच्या लाल मातीतील खेळ म्हणजे कुस्ती होय. महाराष्ट्रातील पुरुष मल्लांप्रमाणेच महिला कुस्तीपटूही आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा राज्यातील प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. आता सांगलीत महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहे.
सांगलीतील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर आज (23 मार्च) पासून महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
23 आणि 24 मार्च रोजी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होतील. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. आखाडा तयार करण्यात आले असून महिला मल्लांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था झाली आहे.
राज्यभरातील 25 संघातून 400 ते 450 महिला मल्ल महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
24 मार्चला सायंकाळी सहा वाजता अंतिम कुस्ती होतील. विजेत्यांना चांदीची गदा व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पहिलीच महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगलीत होत आहेत.
महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिषदेचे कार्याध्यक्ष पै. नामदेवराव माहिते तसेच सांगली तालीम संघटनेचे पदाधिकारी विलास शिंदे, संपत जाधव, कृष्णा शेंडगे, प्रतापराव शिंदे, शिवाजी जाधव, हणमंतराव जाधव, सुनील मोहिते, रवींद्र गायकवाड आदी परिश्रम घेत आहेत.