सांगली जिल्ह्यातील जत तालुका बारमाही दुष्काळी पट्टा म्हणून ओळखळला जातो. कमी पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
पाण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला होता. तेव्हा राज्यभर जत तालुक्याची चर्चा झाली होती.
आता याच दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्याने केलेल्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा आहे. काश्मीरमधील नंदनवन समजले जाणारे सफरचंद जतमध्ये पिकवले आहे.
जत तालुक्याच्या अंतराळ येथील काकासाहेब सावंत हे एक प्रयोगशील शेतकरी आहेत. काही वर्षांपासून त्यांच्या मनात आपल्या शेतीत सफरचंदाची लागवड करण्याचे विचार सुरू होते.
सफरचंद लागवडीसाठी थंड हवामान लागते. त्यामुळे त्यांनी हिमाचल प्रदेशात जावून सफरचंदाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा केली.
सावंत यांनी सुरुवातीला हिमाचल प्रदेशातून 'हरमन 99' या वाणाची 150 रोपे आणली. त्याची एक एकरात लागवड केली.
कडक उन्हामुळे यातील 25 रोपे काही दिवसातच मरून गेली. पण, योग्य ती काळजी घेतल्यानंतर यातील 125 रोपे जगली.
या भागात पाणी कमी असल्याने ठिबकच्या माध्यमातूनच त्यांनी या रोपांना पाणी आणि काही आवश्यक खतांचे डोस दिले. तसेच शेणखताचाही वेळोवेळी वापर केला.
लागवड करून दोन वर्षे झाल्यानंतर आता प्रत्येक झाडाला 30 ते 40 सफरचंद लागली आहेत. एकेका सफरचंदाचे वजन 100 ते 200 ग्रॅम इतके आहे.
सध्याच्या बाजारभावाचा विचार करता एका झाडापासून त्यांना 600 ते 1600 रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. तर संपूर्ण बागेतून 75 हजार ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
सावंत यांच्या बागेतील सफरचंदामध्ये आणि हिमाचल प्रदेशातून येणाऱ्या सफरचंदामध्ये काहीही फरक दिसून येत नाही. लालभडक रंग, फळाची गोडी आणि वाससुद्धा एकसारखाच आहे.
सावंत यांच्या या अभिनव प्रयोगामुळे जम्मू-काश्मिरप्रमाणेच आता सावंत यांच्या भोंड्या माळावरही सफरचंदाची बाग डौलाने डोलू लागली आहे. जिद्द आणि चिकाटीला अभ्यासाची जोड दिली तर जतसारख्या खडकातूनही सोने पिकवता येते, हे सावंत या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.