व्हॅलेंटाइन डे असो किंवा लग्न समारंभ किंवा प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाला विशेष महत्त्व आहे. त्यात प्रेम व्यक्त करण्यासाठी तर लाल गुलाबाला विशेष महत्त्व आहे.
लग्नसराईत गुलाबाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तुम्ही गुलाबाची शेती करुन त्यामधून लाखो रुपयांची कमाई करू शकता.
सांगली इथे एका व्यक्तीनं गुलाबाची शेती करुन लाखोंची उलाढाल केली आहे. त्यात व्हॅलेंटाइन डेला या गुलाबांना अच्छे दिन आल्याचं पाहायला मिळालं आहे.
सांगली जिल्ह्यातील सोनी पाटगाव भागातील वातावरण गुलाबाला पोषक आहे. त्यामुळे हीच मेख ओळखून त्यांनी गुलाबाची शेती करण्याचा निर्णय घेतला.
शेतकरी नंदकुमार माळी यांनी दोन एकरात गुलाबाची बाग फुलवण्याचा निर्णय घेतला. साधारण या गुलाबाचं पिक 5 ते 6 महिन्यांमध्ये येतं. ही गुलाबं तयार झाली की ती कटिंग करुन मिरज तालुक्यातील मार्केटमध्ये पोहोचवली जातात.
मिरजमधून नंतर ही गुलाबं पुणे आणि मुंबईसह गोवा, कर्नाटक आणि दिल्लीपर्यंचा प्रवास करतात असं माळी यांनी सांगितलं.
नंदकुमार माळी यांचं प्रत्येक महिन्याला एकरामागे सरासरी 50 हजार रुपयांचे उत्पादन होतं. लग्नसराई, व्हॅलेंटाइन डे या कालावधीमध्ये गुलाबाला चांगली मागणी असते. त्यामुळे नफाही चांगला होतो.
गुलाबांवर कीड लागू नये किंवा इतर रोग येऊ नयेत म्हणून त्यांना आठवड्यात दोन वेळा फवारणी करावी लागते.
कोरोनामुळे गुलाब उत्पादकांना मोठा फटका बसला होता. मात्र यावर्षी सणसमारंभ, व्हॅलेंटाइन डे आणि लग्नसराईत पुन्हा एकदा गुलाबाला आणि शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत.