'मूर्ती लहान पण, किर्ती महान ' ही म्हण नाशिकच्या सिडको परिसरात राहणाऱ्या पूजा घोडके या तरुणीने सिद्ध करून दाखवली आहे.
फक्त 3 फूट उंची असलेली पुजा आयुष्यात काय करणार ? म्हणून तिला लहानपणापासून अनेक जण चिडवत असत. पण पूजानं सर्वांना उत्तर दिलंय.
पूजाचं एमकॉमपर्यंत शिक्षण झालंय. त्यानंतर तिला उंचीमुळे नोकरी मिळण्यात अडचण येत होती. या अडचणींवर जिद्दीनं मात करत तिनं पापड उद्योग सुरू केलाय.
'मला बँकेत नोकरी करण्याची इच्छा होती. त्यासाठी अनेक परीक्षा दिल्या पण त्यामध्ये यश मिळालं नाही,' असं पूजानं सांगितलं.
पूजाची बोटं लहान असल्यानं तिला टायपिंग करता येत नसे. त्यामुळे नोकरीसाठी परीक्षा न देता व्यवसाय करण्याचं पूजानं ठरवलं.
पूजानं बँकेकडून कर्ज घेऊन,पापड,कुरडई, शेवई तयार करण्याचे मशीन घेतले आणि व्यवसायाला सुरुवात केली. या व्यवसायात तिचा चांगला जम बसला आहे.
उंची कमी असली म्हणून काय झालं,माणसाच्या मनात काम करण्याची जिद्द आणि चिकाटी जर असेल तर आयुष्यात काहीच कमी पडू शकत नाही, हा संदेश पूजानं दिला आहे.