विदर्भात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने धुमाकूळ घातला आहे. उपराजधानी नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सुरू असलेलं पावसाचं थैमान पुढील आठवड्यातही कायम राहील, अशी शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने 25 एप्रिल रोजी विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांना तर 26 एप्रिल रोजी अमरावती, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे.
25 व 26 एप्रिल रोजी विदर्भातली बहुतांश भागात गारपीट, विजांच्या कडकडाटासह 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचे अंदाज हवामान विभागाने वर्तवली आहे, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये या दिवसात यलो अलर्ट घोषित केला आहे.
दिनांक 25, 26, 27 आणि 28 एप्रिल रोजी विदर्भातील सरसकट सर्वच जिल्हामध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर 27 व 28 एप्रिल रोजी विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वादळ वाऱ्याचा इशारा दिला आहे.
या अनुषंगाने नागरिकांनी विशेषता शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. नागरिकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नियंत्रणाला 0712- 2562668 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
विदर्भात एप्रिल आणि मे हे दोन महिने असह्य उन्हाचे असतात. अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आसल्याने पारा अधिक घसरला आहे.
सध्याचे वातावरण लक्षात घेता विदर्भात उन्हाळा आणि पावसाळा एकत्रच सुरू असल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.