पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज महिलांनी सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. चूल आणि मूल ह्या समिकरणाला छेद देत आता महिला उंबऱ्याच्या बाहेर पडल्या आहेत.
स्त्री-पुरुष विषमतेची दरी दूर व्हावी आणि समाजात स्त्रियांनादेखील पुरुषांप्रमाणे भयमुक्त जीवन जगता यावे यासाठी काही महिला संघटना कार्यरत आहेत.
नागपूरमधील सहयोग ट्रस्ट आणि स्वराज फाउंडेशनने 'नाईट टी विथ आजादी' या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले.
नागपूरच्या विविध क्षेत्रात कार्यरत महिला अधिकारी, कर्मचारी आणि इतर सर्वसामान्य महिला शंकरनगर चौकात एकत्र आल्या आणि रात्री 11.30 वा. चहाच्या टपरीवर चहाचा आनंद घेत चर्चा केली.
हा अनोखा उपक्रम ह्यूमन राइट्स अँड लॉ डिफेंडर्सच्या प्रमुख ॲड. स्मिता सरोदे सिंगलकर आणि सहयोग ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रवींद्र भुसारी यांनी राबविला.
नागपुरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि उद्योग क्षेत्रातील महिला 'नाईट टी विथ आजादी' उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.