महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील पेंच नदीपात्रात मगरी आणि कासव यांचा अधिवास आढळून आला आहे. नुकतेच नागपूरमधील पेंच व्याघ्र प्रकल्पात पहिले मगर आणि कासव सर्वेक्षण करण्यात आले. अशा प्रकारचे मध्य भारतातील हे पहिलेच सर्वेक्षण आहे.
मगर आणि कासव या दोन्ही प्राण्यांची नदीतील घनता आणि त्यांच्या अधिवासाच्या वापराचा अभ्यास केला जावा हा या सर्वेक्षणाचा उद्देश आहे. सहभागी चमूनी अंदाजे 200 किमी नदीच्या लांबीचे सर्वेक्षण केले.
या सर्वेक्षणात ३० मगरींचे निरीक्षण करण्यात आले. सोबतच 24 गुफा, नांदपूर संरक्षण कुटी ते किरगीसर्रा पर्यंतच्या पट्ट्यात मगरींची सर्वाधिक घनता आढळून आली आहे.
पूर्वी कासव फक्त तोतलाडोह जलाशयातच आढळून आले. तोतलाडोहात लीथच्या सॉफ्टशेल कासवाची नोंद झाली. ते पेंचमध्ये पहिल्यांदाच दिसले आहे. पानमांजर प्रत्यक्षपणे दिसली नसली तरी मच्छीमारांशी झालेल्या संवादामध्ये त्याचे अस्तित्व असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या सर्वे करिता तांत्रिक बाबी सांभाळण्यासाठी तीनसा इकोलॉजिकल फाउंडेशनची मदत घेण्यात आली. त्यांच्या चमूने सर्वेक्षणाची रचना तयार करताना तोतलाडोह, अप्पर आणि लोअर पेंच जलाशय असे तीन भाग केले होते.
सर्वेक्षणासाठी विभाग आणि मच्छीमार बोटींचा वापर करण्यात आला. सहभागींनी 'मॉडिफाइड बेल्ट ट्रान्सेक्ट ऑन बोट' ही पद्धत वापरून सर्वेक्षण केले. ही एक प्रकारची सुधारित लाईन ट्रान्सेक्ट पद्धत आहे.
काठावर गवताची घनता जास्त असल्यामुळे कासवांना प्रत्यक्ष पाहणे कठीण होते. संवर्धनास मदत करण्यासाठी लगतच्या भागात 'मगरमित्र' उपक्रम सुरू करण्याचे नियोजन आहे. याशिवाय, अंडी उबवण्याचा कालावधी असलेल्या जून महिन्यात मासेमारी टाळा अशा सूचना देण्यात आल्यात.
दरम्यान, आक्रमक तलापिया माशांचा स्थानिक मत्स्यविविधतेवर घातक प्रभाव टाकणारा प्रभाव कमी करण्यासाठी योजना आखण्यावर चर्चा करण्यात आली. सर्वेक्षणात गोळा केलेल्या माहितीच्या आधारे एक अहवाल तयार केला जाईल जो पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या संवर्धन प्रक्रियेत मदत करणार आहे.
मगरी नदीच्या परिसंस्थेतील सर्वोच्च शिकारी असल्याने, त्यांची उपस्थिती आणि जागेचा वापर एका चांगल्या परिसंस्थेचं लक्षण दर्शवते, असे पेंच प्रकल्पाचे उपसंचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांनी सांगितले. (फोटो साभार: अंकिता दास)