महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. वाघांसोबतच असंख्य वनस्पती, प्राणी, पक्षी या ठिकाणी आढळतात. नुकतेच पेंचमध्ये तीन दिवसीय उन्हाळी पक्षी सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये पक्ष्यांच्य तब्बल 220 प्रजातींची नोंद झाली आहे.
यामध्ये मलबार पाईड हॉर्नबिल्स, ग्रे हेडेड फिश ईगल, लॉग बिल्ड व्हल्चर, ब्लॅक ईंगल, ग्रेट थिकनी, ऑरेंज हेडेड थ्रैश, व्हाइट रम्पड गिधाड, स्पॉट बेलीड ईगल आऊल या महत्त्वाच्या प्रजातींची समावेश आहे.
जानेवारीत झालेल्या सर्वेक्षणात 226 पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद झाली होती. तीनसा इकॉलॉजिकल फाउंडेशनच्या सहकार्याने नागरिक विज्ञानावर आधारित या उपक्रमात 11 राज्यांतील 70 स्वयंसेवक सहभागी झाले होते.
सिटीझन सायन्स मॉडेलचा वापर करून विविध मोसमात पक्ष्यांची विविधता व घनता अभ्यास करणे हा यामागचा उद्देश आहे.
नागरिकांच्या सहभागातून सर्वेक्षण मोठ्या प्रमाणावर पाश्चात्त्य देशांमध्ये केले जाते. अलीकडे भारतातील अनेक क्षेत्रात विविध जैवविविधता सर्वेक्षणांवरील मोठ्या प्रमाणात डेटा संकलनात याचा सहयोग आणि योगदान मिळत आहे.
उपक्रमात सहभागी झालेल्यांना दोन ते तीनच्या चमूमध्ये विभागण्यात आले. त्यांना 45 वनरक्षकांच्या कुटीवर पाठवण्यात आले.
तीनसाच्या चमूने डिझाइन केल्यानुसार सर्वेक्षणा दरम्यान पक्ष्यांची विविधता रेकॉर्ड करण्यासाठी 'लाईन ट्रान्सेक्ट" आणि 'पॉइंट काउंट" पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता. संपूर्ण माहिती 'कोबो कलेक्ट' अॅप्लिकेशनच्या माध्यमातून संकलित करण्यात आली.
सर्वेक्षणादरम्यान संकलित केलेल्या डेटाचा तपशीलवार वैज्ञानिक अहवाल तीनसा चमू आणि पेंच व्याघ्र प्रकल्प प्रकाशित करणार आहे.
या प्रकारची सर्वेक्षणे पक्ष्यांचे संवर्धन, जागरूकतेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरतात. या उपक्रमांद्वारे पर्यटनाला चालना मिळून व्याघ्र केंद्रित संवर्धन आणि लँडस्केप स्तरावरील संवर्धनाकडे मोठ्या प्रमाणात नागरिकांना आकर्षित करता येईल, असे क्षेत्र संचालक श्रीलक्ष्मी यांनी सांगितले. (फोटो साभार : श्रीकांत ढोबळे)