देशातील मुली आता सर्व क्षेत्रात आघाडीवर असून भारतीय सैन्य दलातही भरती होत आहेत. नागपुरातील सिद्धी दुबे ही वयाच्या 22 व्या वर्षी नौदलात फ्लाइंग पायलट झाली आहे. तिच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
देशसेवेसाठी कार्यरत असणारी सिद्धी ही तिच्या कुटुंबातील तिसरी पिढी आहे. सिद्धीचे आजोबा भारतीय सैन्यात सुभेदार होते आणि तिचे वडील भारतीय हवाई दलातून निवृत्त झाले.
SSB परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, नौदलात फ्लाइंग पायलटसाठी 396 जणांनी पाच दिवसांच्या कठोर मुलाखत प्रक्रियेत भाग घेतला. त्यापैकी 4 जणांची निवड झाली आहे. यातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या चार जणांपैकी तीन मुली आहेत.
भारतीय नौदलातील महिला वैमानिकांची ही दुसरी तुकडी आहे. पहिल्या बॅचमध्ये 1 महिला फ्लाइंग पायलट होती. आता तिघींच्या निवडीनंतर ही संख्या चार झाली आहे.
सिद्धीने 2022 मध्ये नागपूरमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ती स्टाफ सिलेक्शन बोर्डाच्या परीक्षे देत अभ्यासासोबतच एअर एनसीसीमध्ये रुजू झाली होती. तीन वर्षांच्या एनसीसी प्रशिक्षणादरम्यान सिद्धीने विमान उडवले होते.
नौदलातील निवडीदरम्यान तिला संगणकीय चाचणी आणि शारीरिक चाचणी यातून जावे लागले. 17 जूनपासून सिद्धी नौदलात रुजू होणार आहे. डिसेंबरमध्ये तिची पासिंग आऊट परेड होणार आहे.
सिद्धी तिच्या यशाचे श्रेय तिच्या कुटुंबाला देते. सिद्धी तिचे स्वप्न जगत आहे. मुलगी फ्लाइंग पायलट झाल्यावर आईच्या आनंदाला पारावार उरला नाही. ती म्हणते, "माझी मुलगी देशाची सेवा करत आहे. ती आता आकाशाला स्पर्श करेल." दुसरीकडे आमची तिसरी पिढी देशसेवा करणार आहे, याचा अभिमान अशल्याचे वडील म्हणाले.