मुस्लिम बांधवांसाठी रमजान हा महिना अतिशय पवित्र मानला जातो. रमजान मध्ये केलेल्या उपासनेचे फळ इतर महिन्यांच्या तुलनेत कैक पटीने जास्त असते, असे म्हटले जाते.
रमजान महिन्यात मुस्लिम बांधव दिवसभर काहीही न खातापिता कडक रोजे म्हणजेच उपवास करतात. तर संध्याकाळी सूर्यास्तानंतर रोजे सोडतात, ज्याला इफ्तार असे म्हटले जाते.
रमजान हा खूप भरभराटी व बरकतीचा महिना मानला जातो. मुस्लिम बांधवांमध्ये या पवित्र महिन्यात मोठा उत्साह बघायला मिळतो.
रमजानच्या काळात शहरातील सर्वच बाजारपेठांमध्ये चैतन्य बघायला मिळते. बाजारपेठा विविध वस्तू, फळांनी फुललेल्या असतात.
नागपुरातील मोमीनपुरा भागातील बाजारपेठ सध्या रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर गजबजलेली आहे. बाजारात खेरदीसाठी ग्राहकांची एकच गर्दी झाल्याचे चित्र आहे.
मुस्लिम समाजात पुरुषांनी टोपी घालणे सुन्नत समजली जाते. टोपी शिवाय पेहराव अपुरा असतो. ईद निमित्त मोमिनपुऱ्यातील बाजारात आकर्षक रंगबिरंगी टोप्या दाखल झाल्या आहे.
रमजानमध्ये अत्तर, सुरमा अरबी, रुमाल, साफा, शॉल, तसबी कुरान शरीफ, काबा मदिनाचे शोपीस याची मागणी ही वाढत आहे.
या दिवसात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण नवीन कपडे परिधान करत असतात. त्यामुळे बाजारात नवीन कपडे, टोपी, पठाणी ड्रेससोबतच रेडिमेड कपडे, लहान मुलांचे कपडे यांना जास्त मागणी आहे.
मुस्लिम बांधवांमध्ये या दिवसात काही विशेष खाद्य पदार्थांची मेजवानी असते. शिरखुर्मा या गोड पदार्थावर रोजाचा समारोप केला जातो.
शिरखुर्मासाठी लागणारे शेवाई, सुखा मेवा इत्यादी पदार्थ तसेच अन्य खजूर, फळ, मिठाई, शेवळ्या, केक इत्यादी प्रकारच्या खाद्य पदार्थांच्या खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या आहे.
मुस्लिम बांधवांना सुगंधी अत्तर, परफ्यूम इत्यादीचा विशेष आकर्षण असून सध्या सुगंधी अत्तरांची दुकाने बाजारात सज्ज झाली आहेत.