विदर्भातील पेंच व्याघ्र प्रकल्प पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. रुडयार्ड किपलिंग यांच्या 'द जंगल बुक'शी कनेक्शन असणारा हा प्रकल्प 25 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
भारत सरकारच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने 2014-15 मध्ये केलेल्या अभ्यासात राज्यातील व्याघ्र प्रकल्पांना अतिउत्तम असा दर्जा दिला. त्यात पेंच व्याघ्र प्रकल्पाचा देखील समावेश आहे.
महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या मध्यभागातून पेंच नदी वहात गेली आहे. ज्यामुळे जंगलाचे दोन भाग पडले आहे.
व्यवस्थापन आणि कामाच्या सोयीसाठी पूर्व आणि पश्चिम वनपरिक्षेत्र असे दोन भाग आहेत. व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र 257 चौरस किलोमीटर मध्ये पसरले आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्पात प्रथमच नागरिक-विज्ञानवर आधारित फुलपाखरू सर्वेक्षण झाले. यामध्ये पाच कुटुंबांमधील 129 प्रजातींची नोंद झाली आहे. याशिवाय 49 नवीन रेकॉर्ड आणि 10 नवीन श्रेणीचा समावेश आहे.
पूर्वीच्या संदर्भाचा अभ्यास केल्यानंतर नवीन रेकॉर्डची पुष्टी केली जाणार आहे. नोंदविलेल्या महत्त्वाच्या प्रजातींमध्ये राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मन, कंजॉइन्ड स्विफ्ट, कॉमन नवाब, ब्लॅक राजा, ब्राऊन किंग क्रो, सायकी, टेललेस पामफ्लाय, क्रिमसन रोझ, कॉमन ट्री ब्राऊन, ग्रास डेमन, कॉमन लास्करचा समावेश आहे.
पेंच प्रकल्पात तिनसा इकॉलॉजिकल फाउंडेशनच्या सहकार्याने पहिले फुलपाखरू सर्वेक्षण केले. सर्वेक्षणात 11 राज्यांतील 105 जण सहभागी झाले होते. त्यात 60 पुरुष आणि 45 महिलांचा समावेश होता.
गुरू घासीदास विद्यापीठ, बिलासपूर, छत्तीसगड, कोटा विद्यापीठ, राजस्थान आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, प्राध्यापक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश होता.
या सर्वेक्षणाचा उद्देश फुलपाखरांसाठी बेस लाइन डेटा तयार करणे हा होता. तिनसा इकॉलॉजिकल फाउंडेशनने सर्वेक्षणाचे नियोजन केले होते.