हवामान विभागाकडून कोकण आणि विदर्भासाठी मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या बातम्या आपण नेहमी पाहात असतो. तर तुम्ही कधी विचार केलाय का? या चार अलर्टचा अर्थ नक्की काय असतो आज आपण त्या बद्दल सविस्तर जाणून घेऊया.
हवामान विभागाने यासाठी काही मापदंड लागू केले आहेत. रेड, ऑरेंज, यलो आणि ग्रीन अशा चार रंगामध्ये हवामान विभाग अंदाज दर्शवतं. पाच दिवसांपर्यंतचा संभाव्य अंदाज हवामान विभाग देऊ शकतं, मात्र तो संभाव्य अंदाज असतो हे मात्र तितकच नागरिकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे.
पावसाच्या अलर्टचं उदाहरण घेऊ. 24 तासांत 64 मिमीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्यास ग्रीन रंग दाखवला जातो. तेच 64.5 मिमी ते 115. 5 मिमी दरम्यान पाऊस असेल तर तो यलो अलर्ट दिला जातो.
ऑरेंज अलर्ट हा 24 तासांत 115.6 ते 204.4 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडणार असेल तर दर्शवला जातो. 24 तासांच्या कालावधीसाठी 204.5 मिमीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित असेल रेड अलर्ट जारी केला जातो.
वादळी वारा, गारांचा अलर्ट किंवा विजांच्या कडकडाचा अलर्टही हवामान विभागाकडून दिला जातो. पिवळा म्हणजे सावध राहा, ऑरेंज म्हणजे तयार राहा आणि रेड म्हणजे तुम्ही अशावेळी योग्य ती कारवाई करुन लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवा.