मुंबई : आता सर्वात आनंदाची बातमी आहे. अखेर प्रतीक्षा संपली असून मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर केरळमध्ये तो दाखल झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या वेळेपेक्षा एक आठवड्या मान्सून उशिरा आला आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याने आनंदाचं वातावरण आहे.
हवामान खात्यानं मान्सूनबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. 4 जूनला मान्सून केरळमध्ये येणार होता. मात्र एक आठवडा उशीर झाला आहे. आता महाराष्ट्रातही मान्सूनच्या पावसाची शेतकऱ्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते.
उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच या उष्णतेपासून दिलासा मिळेल अशी आशा आहे. तर शेतकऱ्यांनी पेरणीची गडबड करु नये असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
दुसरकीडे किनारपट्टीलगतच्या भागांवर हवामान विभागाने चक्रीवादळामुळे अलर्ट जारी केला आहे. 8 ते 13 जून या कालावधीमध्ये समुद्रकिनाऱ्यालगच्या भागांना अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मासेमारी करणाऱ्यांना खोल समुद्रात जाऊ नये असं आवाहन केलं आहे.
कोकणात 16 जून नंतर मान्सून येईल असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आता चक्रीवादळ मान्सूनची वाट अडवणार का याकडे देखील हवामान विभागाचं लक्ष असणार आहे.
विदर्भात पुढचे तीन दिवस मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मुंबईसह उपनगरात कमालीची उष्णता वाढली आहे.