महाराष्ट्राची लोककला अस्सल मराठीची ठसकेबाज लावणी ही तमाम मराठी जनांची अस्मिता आहे. हीच लावणी सातासमुद्रपार पोहोचली असून तिचे जगभरात चाहते आहेत.
लावणी म्हटलं की आपल्याला एखादी लावणी सम्राज्ञी आठवते. लावणी ही केवळ महिलांची मक्तेदारी नाही तर पुरुषही पायात घुंघरू बांधून आपल्या अदाकारीने लाखोंची मने जिंकू शकतो.
आपला विश्वास बसणार नाही मात्र मुळचा सातारकर आणि सध्या लातूरमध्ये वास्तव्यास असणारा लावणी सम्राट शिवम विष्णू इंगळेनं हे करून दाखवलं आहे. त्याच्या लावणीनं अनेकांना भूरळ घातली असून सोशल मीडियावरही शिवमच्या अदाकारीचे लाखो चाहते आहेत.
शिवम हाा मुळचा साताऱ्यातील असून सध्या लातूरमध्ये कृषी पदवीचे शिक्षण घेतोय. त्याला लहानपणापासूनच लावणीची आवड होती. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची लावणी बघून त्याला या नृत्य प्रकाराबद्दल आकर्षण वाटू लागलं.
पुणेकर यांच्या लावणीच्या कॅसेट्स आणून तो लावणी आणि त्यातील बारकाव्यांचे निरीक्षण करू लागला. यातूनच त्याला लावणीची आवड निर्माण झाली आणि त्यानं स्वत:च्या पायात घुंगरू बांधायला सुरुवात केली.
शिवम लावणी करू लागला तेव्हा त्याला घरातून विरोध झाला. मुलानं लावणी करणं कुटुंबीयांना न पटणारं होतं. तरीही शिवमनं लावणी सुरूच ठेवली.
11-12 वी पासून शिवमनं वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. त्याची लावणी बघून कुणालाच एखादा मुलगा एवढी चांगली लावणी करू शकतो, यावर विश्वास बसत नव्हता.
काही लोकांकडून शिवमला नाहक त्रासालाही सामोरं जावं लागलं. लोक बायल्या म्हणतात, छक्का म्हणतात. मला लोकांना हेच सांगायचंय, कुणी काहीही असो. प्रत्येकाकडे एक माणूस म्हणून तुम्ही बघा, असं शिवम म्हणतो.
बीडच्या गेवराईत शिवमनं सलग 26 ताल लावणी करण्याचा विश्वविक्रम केला. त्याच्या या विक्रमाची दखल ऑरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं घेतली आहे. शिवमनं न थकता, न थांबता सलग 26 तास लावणी सादर करून या विश्वविक्रमाला गवसणी घातली.