कोल्हापूर जिल्हा आणि परिसरात पोषक वातावरणामुळे बहुतांश शेतकरी उसाची शेती करतात. मात्र, काही शेतकरी याला अपवाद असून ते आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करत असतात.
कोल्हापुरातील एक शेतकरी गेली काही वर्षे पारंपारिक ऊस शेतीला फाटा देत आपल्या शेतात वांग्याचे उत्पादन घेत आहे. विशेष म्हणजे वांग्याच्या शेतीतून त्यांना लाखोंचा नफा मिळत आहे.
कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली या गावी शेतकरी सुदर्शन जाधव राहतात. त्यांच्याकडे असणाऱ्या एकूण नऊ एकर शेतीपैकी एकूण सात एकर बागायत जमीन, तर दोन एकर जिरायत जमीन असे शेती आहे.
जाधव कुटुंबीय गेल्या दहा ते बारा वर्षांत अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे फळभाज्या आणि पालेभाज्या यांची शेती करत आहे. यातून वर्षाखेर तब्बल बारा लाखांच्या आसपास उत्पन्न ते घेत आहेत.
सुदर्शन यांनी एक एकर क्षेत्रात गॅलन जातीच्या वांग्याची लागवड केली. भरिताचे वांगे म्हणून देखील याला ओळखले जाते. या जातीच्या वांग्याची खासियत म्हणजे हे कमी जागेत जास्त उत्पन्न देणारे पीक आहे.
या पिकाला साधारण 70 व्या दिवसापासूनच फळे येण्यास सुरुवात होते. तर पुढे 3 ते 4 महिने सरासरी तब्बल 40 टन गॅलन वांग्याचे उत्पन्न सुदर्शन काढतात. त्याचबरोबर बाजारपेठेत या गॅलन वांग्याला दरही चांगला मिळतो.
शेतातील गॅलन वांग्याच्या पिकाची कोल्हापूरसह मुंबई, पुणे, गोवा बेळगाव येथील बाजारपेठेत विक्री होते. या वांग्याचा भरीत बनवण्यासाठी त्याचबरोबर माशा बरोबर खाण्यासाठी देखील केला जातो.
दरवर्षी वांग्यातून सरासरी 8 लाख रुपये उत्पन्न मिळते. मशागत खर्च साधारण 2 लाख सोडल्यास जवळपास 6 लाख रुपयांचा नफा सुदर्शन यांना फक्त गॅलन वांग्याच्या शेतीतून मिळत आहे.
सुदर्शन यांची शेती इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने केली जाणारी ही शेती पाहण्यासाठी इतर शेतकरी येत असतात.