जालनामधील रेवती काकड या तरूणीनं फॅशन डिझायनिंग क्षेत्रात स्वत:चा ब्रँड तयार केला आहे. रेवतीनं रेशमी कापडावर नक्षीकाम भरतकाम केलेल्या कपड्यांना संपूर्ण देशभर मागणी आहे. त्याचबरोबर मलेशिया, कॅनडा आफ्रिका इथंही त्याची विक्री होत आहे. कापड उद्योगातही महाराष्ट्रीय संस्कृतीचा ठसा उमटावा म्हणून तिनं 2021 मध्ये हा उद्योग सुरु केला. कोरोना काळातील संकटावर मात करण्यासाठी तिनं सर्व प्रॉडक्टची ऑनलाईन विक्री सुरू केली. रेवतीनं तयार केलेल्या कपड्यांची किंमत 2 ते 20 हजार असून जालनामधील जवळपास 30 महिलांना तिनं रोजगार दिला आहे. महिलांना कलाकुसरची कला अवगत असेल तर त्यांच्या कलेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं रेवतीनं सांगितलं. कोणत्याही संकटावर मात करून जिद्द तसेच मेहनतीच्या बळावर रेवतीनं तिचं प्रॉडक्ट सातासमुद्रापार पोहचवलंय. जालना जिल्ह्यातील तरुणींसाठी ती आदर्श ठरली आहे.