मराठवाड्यातील जालना जिल्हा हा मोसंबच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातल्या अंबड, घनसावंगी, बंडनापुर आणि जालना तालुक्यात मोसंबी बागा मोठ्या संख्येने आहेत. जालना शहरातच मोसंबी मार्केट उपलब्ध असल्याने बागायती जमीन असलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मोसंबी बागीच्याची लागवड केलीय.
हमखास उत्पादन देणारे पीक म्हणून मोसंबीकडं पाहिलं जातं. पण, लांबलेल्या पावसानं या शेतकऱ्यांच्या काळजीत भर पडलीय. मान्सून लांबल्यानं जालना जिल्ह्यातल्या बहुतेक मोसंबी बागांना मृगाचा बहार आलेला नाही. त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
यंदा मान्सून जवळपास महिनाभर लांबला. त्यामुळे मृग बहराचं शेतकऱ्याचं गणित चुकलं. मोसंबीच्या बागा फुटलेल्या नाहीत हे खरंय. पण, मोसंबी दरावर अनेक घटक परिणाम करत असतात. आपल्या मोसंबीला इतर राज्यात मोठी मागणी असते.
सध्या मृग बहार कमी असला तरी ऑगस्ट महिन्यात हस्त बहार घेण्याची संधी शेतकऱ्यांना आहे. पुढच्या महिन्यात ही कसर भरुन निघेल अशी आशा आहे, अशी माहिती जालना मोसंबी अडत्या असोसिएशनचे अध्यक्ष नाथा पाटील घनघाव यांनी दिली.
यंदा अंबिया बहार चांगल्या प्रमाणात आलाय. त्यामुळे मालाची कमतरता भासणार नाही. मोसंबीला मागच्या वर्षी 12 ते 18 हजार रुपये प्रती टन असा दर मिळाला होता. तो यंदाही मिळू शकतो. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मोसंबीच्या पुरवठ्यात घट होते. त्यावेळी हे दर 20 हजारांपेक्षा जास्त होतील, अशी आशा घनघाव यांनी व्यक्त केलीय.