यवतमाळ जिल्ह्यातील पुरानं वेढलेल्या महागावात हवाई दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलेय. पुरात अडकलेल्या 110 लोकांची सुटका करण्यासाठी वायूदलाचं MI 17 V5 हेलिकॉप्टर नागपूरहून महागाव येथे दाखल झाले होते. हेलिकॉप्टरच्या मदतीनं बचावकार्य राबवण्यात आले.
तर, दुसरीकडं SDRF ची टीम देखील महागावात पोहोचली. SDRF च्या बोटीमधून पूरग्रस्तांना बाहेर काढण्यात आले. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन तातडीने मदत पोहचवण्यासाठी प्रशासनास सुचना दिल्या.
यवतमाळच्या महागाव तालुक्यातील अनंतनगर गावाला पुराने वेढा घातल्याने ग्रामस्थ अडकून पडले. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रशासनानं हेलिकॉप्टरसह SDRFची टीम बचावकार्यासाठी बोलावली.
जिल्ह्यात सर्वच ठिकाणी पूरस्थिती असून अनेक मार्ग बंद पडलेत. यवतमाळच्या महागाव तालुक्यात पुराच्या पाण्याने वेढा घातला असून, आनंदनगर तांडा इथे 110 लोक अडकले होते.
महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे अडकलेल्या सर्व 110 नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाच्या देखरेखीत SDRF चमूने बोटींच्या साहाय्याने हे मिशन पूर्ण केले. संपूर्ण टीमचे अभिनंदन, असे ट्विट फडणवीस यांनी बचावकार्यानंतर केलं.