बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात मागच्या चार दिवसांपासून वादळी पाऊस होत आहे. दरम्यान पुढचे दोन दिवसा वादळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. याचबरोबर उन्हाच्या झळाही वाढण्याची शक्यता आहे.
आज (दि.16) मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा इशारा आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यातील उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे.
राज्यात मागच्या 24 तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी 42.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर ब्रह्मपूरी येथे तापमान 42 अंशांवर होते. अकोला, गोंदिया, वर्धा, जळगाव येथे तापमान 41 अंशांच्या पुढे होते. उर्वरीत राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान वाढून 36 ते 40 अंशांच्या दरम्यान असून, उन्हाचा चटका वाढतच आहे.
राज्यात वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर या जिल्ह्यात पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील बुलडाणा, वाशीम, वर्धा, नागपूर, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर या भागातही पावसाची शक्यता आहे.
मागच्या दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी, नगर, कोल्हापूर, सांगली, पुणे, लातूर, परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली होती. यातच नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 1.5 ते 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.
झारखंडपासून, ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, खंडीत वारे वाहत आहेत.
आज (दि. 16) मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.