मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली आहे. मुंबईच्या ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंच्या प्रकृतीची विचारपूस केली.
धनंजय मुंडे यांची सातवी आणि आठवी बरगडी फ्रॅक्चर झाली आहे, त्यामुळे त्यांना ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
4 जानेवारीला परळीमध्ये रात्री 12.30 च्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातानंतर धनंजय मुंडेंना परळीमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण नंतर पुढच्या उपचारांसाठी मुंडेंना विमानाने मुंबईला आणण्यात आलं.
या अपघातानंतर धनंजय मुंडे यांची छाती आणि बरगड्यांना दुखापत झाली. धनंजय मुंडे यांच्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडेंच्या तब्येतीची विचारपूस केली. मी डॉक्टरांना सांगितलं आहे, त्यांना जेवढे दिवस रुग्णालयात ठेवायचं आहे तेवढे दिवस ठेवा, पण कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, असं अजित पवार यांनी सांगितलं.