महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. एकीकडे कांदा, वांगी पिकाला भाव मिळत नाहीए. तर तेच दुसरीकडे आणि सर्वसामान्य लोकांना महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या महिनाभरात गहू, गव्हाचे पीठ, खाद्यतेलाच्या किंमतीबाबत दिलासा मिळाला. मात्र, इतर वस्तूंच्या किंमती चढ्याच असल्याने त्याचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.
येत्या 20 दिवसांत देशातील बाजारात गव्हासह इतर दाळधान्याची आवक वाढेल. पण दूधाचे भाव ज्या पटीत वाढले आहे, ते आटोक्यात आणणे अत्यंत आवश्यक आहे.
सर्वात अगोदर पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याची जोरदार मागणी होत आहे. तर पीठ, मैदा, रवा , दूध, अंडी, ब्रेड आणि इतर अनेक वस्तूंच्या किंमती एकतर महागल्या आहेत.
खाद्यतेलाच्या घाऊक किंमतीत मोठी घसरण झाली. पण ब्रँडेड कंपन्यांनी मात्र भाव कमी केलेले नाही. ना किंमती वाढवल्या ना त्या कमी केल्या, असा दावा कंपन्यांनी केला आहे.
जानेवारीत किरकोळ 700 ग्रॅमच्या ब्रेडच्या दरात दोन रुपये, ब्राऊन ब्रेडच्या पॅकेटमागे पाच रुपयांची वाढ झाली आहे. बेकरी उत्पादनात ग्राहकांना अद्याप कसलाही दिलासा मिळालेला नाही. जानेवारीत 700 ग्रॅमच्या ब्रेडचे पॅकेट 50 रुपयांहून 52 रुपये तर ब्राऊन ब्रेडचे पॅकेट 50 रुपयांहून 55 रुपये झाले आहे. प्रत्येक राज्यात आणि शहरातील भावात तफावत दिसून येते.
सलग दुसऱ्या वर्षी धडकत असलेल्या उष्णतेच्या लाटांचा विपरीत परिणाम गहू, तेलबिया, हरभरा यांच्या उत्पादनावर होण्याची दाट शक्यता आहे.
मार्चमध्ये काढणीला आलेली पिके उष्णतेच्या माऱ्यामुळे होरपळण्याची चिन्हे आहेत. चलनवाढीचा दर नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नांना याची झळ बसून महागाई आणखी वाढेल, अशी शक्यता आहे.