प्रत्येक गावाचं एक खास वैशिष्ट्य असतं. त्या वैशिष्ट्यामुळे त्याची सर्वत्र ओळख असते. काही गावं निसर्गसंपन्न वारशासाठी तर काही मानवनिर्मित गोष्टींसाठी प्रसिद्ध असतात.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं एक गाव सरकारी नोकरदारांसाठी प्रसिद्ध आहे. या गावात फक्त 75 घरं आहेत, त्यापैकी 50 पेक्षा जास्त घरातील मुलं वेगवेगळ्या सरकारी नोकरीत काम करतात.
पैठण तालुक्यातील सानपवाडी असं या गावाचं नाव आहे. या गावाची 400 लोकसंख्या आहे. त्यामध्ये एक उपविभागीय अधिकारी, एक सहाय्यक पोलीस निरिक्षक, एक पोलीस निरीक्षक, 23 पोलीस कर्मचारी, पाच शिक्षक आणि सहा जण भारतीय सैन्य दलात आहेत. त्याचबरोबर पाच इंजिनिअर आणि सहा डॉक्टर देखील या गावात आहेत.
या गावात पाण्याचा दुष्काळ असला, तरी गुणवत्तेच्या बाबतीत पुढारलेले आहे. या गावाला अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जात होते. गेल्या काही वर्षांपासून अधिकारी होण्याची परंपरा निर्माण झाली आहे. वर्षी पोलिस भरती असो किंवा शिक्षक भरती या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आपल्या गावातील कोणाची निवड झाली, याची उत्सुकता ग्रामस्थांना लागून असते.
सानपावडी गावातील मुलांना प्राथमिक शाळेपासूनच स्पर्धा परीक्षा देण्याची प्रेरणा देण्यात येते. वेगवेगळ्या प्रश्नमंजुषेचे कार्यक्रम शाळेत राबवले जातात. तालुका आणि जिल्हा पातळीवरील प्रश्नमंजूषा स्पर्धेची तयारीही शाळेत घेतली जाते. या गावातील विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये यश मिळवतात.
शाळेत पाया तयार झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयातही स्पर्धा परीक्षेची गोडी लागते. कोणत्याही शाखेची पदवी मिळाली तरी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. या गावात तसं वातावरणच तयार झालंय.
सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये या गावातील विद्यार्थी अभ्यास करत आहेत. या परीक्षेत यश मिळालेले विद्यार्थी आणखी यश मिळवण्यासाठी जिद्दीनं प्रयत्न करतात. त्यामुळे अधिकाऱ्यांचं गाव, अशी या गावाची ओळख झालीय, अशी माहिती येथील ग्रामस्थांनी दिलीय.