वर्धा, 27 मे : अपघातात आई गमावलेल्या वानराच्या पिल्लाला टेडी बीयरच्या स्वरूपात मातृत्वाचा आधार देण्यात आला आहे. टेडी बियरला आपली आई समजत पंधरा दिवसांचे पिल्लू आता जवळपास अडीच महिन्याचं झालं आहे. (नरेंद्र मते, प्रतिनिधी)
वानराच्या पिल्लाच्या आईचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्यावर अवघ्या पंधरा दिवसाच्या पिल्लाचा सांभाळ करण्याचे आव्हान वर्ध्यातील प्राणी मित्रांनी यशस्वीरित्या पेललं आहे.
पिपरी (मेघे) येथील पीपल फॉर एनिमल्सच्या करुणाश्रमात पिल्लाचं संगोपन सुरू आहे. सहा ते सात महिन्यांनी योग्य होताच पिलाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर रस्ता ओलांडताना वानराच्या कळपातील एका मादी वानराचा अपघात झाला. अपघातात मादी वानरालाआपला जीव गमवावा लागला. रस्त्यावर आई रक्तबंबाळ असताना अवघ्या पंधरा दिवसाच पिल्लू आईला बिलगून होतं.
तेथून मार्गक्रमण करणाऱ्यांनी मादी माकड आणि पिल्लाला करूणाश्रमात आणण्यात आले. आईच्या मृत्यूनंतर पिल्लाचा सांभाळ करण्याचे आव्हान प्राणिमीत्रांपुढे होते. त्यावर पिल्लाला आई मिळवून देण्यासाठी प्राणीमीत्रांनी एक शक्कल लढविली.
टेडी बियर म्हणजेच खेळण्यातलं मोठं बाहुलं या पिल्लाजवळ ठेवलं. हळूहळू या निर्जीव बाहुल्यात माकडाच्या पिल्लाला लळा लागला.
बाहुल्याला दुधाची बॉटल बांधून दूध पिल्लाला पाजण्यास सुरवात केली. दिवसेंदिवस वानराच पिल्लू आणि टेडी बियर यांच्यातील नाते घट्ट होत आहे.