मुळा-प्रवरा-गोदावरी या तिन्ही नद्या नेवासे तालुक्यातून वाहतात. या नद्यांचा संगम तालुक्यातीलच टोका (प्रवरासंगम) येथे असलेल्या श्री सिद्धेश्वर देवस्थानाच्या पायथ्याशी होतो.
त्रिवेणी संगम असलेल्या नद्यांची नयनरम्य दृश्य कॅमेऱ्यातून टिपली आहेत. नदीचं विस्तारलेलं रूप आणि हिरवाईने नटलेला परिसराचे विहंगम दृश्य नजरेला भुरळ घालणारं आहे.
अहमदनगर जिल्हा तसा विविधतेने नटलेला आहे. अनेक वेगवेगळ्या गोष्टी या जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळतात. जिल्ह्यात अनेक महत्त्वपूर्ण पर्यटनस्थळे आहेत. त्यातीलच एक नद्यांचा संगम पर्यटकांना भुरळ घालते.
प्रवरासंगम येथे कायगाव टोके गावाजवळ श्री सिद्धेश्वर मंदिर समूह आहे. अहमदनगर आणि औरंगाबाद यांची सीमा म्हणजे अमृतवाहिनी प्रवरा नदी आणि दक्षिणगंगा गोदावरी यांचा प्रवरासंगम आहे. कायगाव टोके गावची ही हद्द आहे.
प्रवरा नदीवरील पूल ओलांडून श्री सिद्धेश्वर मंदिर समूहाकडे जाता येते. नगरहून हे अंतर 60-70 किमी आहे. हमरस्ता ते खुद्द मंदिर हे अंतर जेमतेम एखाद्या किलोमीटरचे आहे. मराठवाडा प्रदेश यादवकालीन शिल्पजडीत मंदिरांनी समृद्ध आहे. त्यामुळे पर्यटनप्रेमी इकडे आकर्षित होतात.