वास्तुशास्त्रात घर, ऑफिस इथल्या दिशांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. वास्तुशास्त्रात जेवढं महत्त्व दिशा आणि घराच्या दरवाजाला आहे तेवढंच महत्त्व खिडक्यांनाही आहे. वास्तुनुसार, जर तुम्ही घरात योग्य जागी खिडक्या बनवल्या असतील तर घरात सकारात्मक उर्जा येईल. पण जर खिडक्या योग्य दिशांमध्ये नसतील तर घरातील सदस्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागू शकतं.
आज आपण घराच्या कोणत्या दिशेला खिडक्या असणं घरासाठी आणि त्यात राहणाऱ्या व्यक्तिंसाठी फायदेशीर असेल हे पाहू. तसेच किती संख्येने खिडक्या बनवल्या गेल्या पाहिजेत याबद्दलही जाणून घेऊ.
वास्तुशास्त्रानुसार खिडक्यांचा आपल्या आयुष्यावर बहुतांशी प्रभाव असतो. त्यामुळे खिडक्यांची नियमित साफ- सफाई करणं आवश्यक आहे. तसंच वेळोवेळी खिडक्यांची ग्रिसींगही करावी, जेणेकरून त्या उघड बंद करताना त्यातून आवाज होणार नाही. खिडक्या शक्यतो मोठ्या बनवाव्यात, जेणेकरून त्यातून सकारात्मक उर्जा येईल. तसेच खिडक्यांचे दरवाजे हे बाहेरच्या बाजूला उघडतील याकडे विशेष लक्ष द्या.
वास्तुशास्त्रानुसार, पूर्व दिशेला खिडक्या असणं सर्वोत्तम मानलं जातं. कारण ही सूर्याची दिशा असते. सूर्याचं पहिलं किरण घरात पडलं तर फक्त सकारात्मक उर्जाच घरात येते असं नाही तर घरात सुख, समृद्धीही येते. याशिवाय नोकरीत प्रमोशनही मिळतं. तर उत्तर दिशेचा स्वामी कुबेर असल्याने त्या दिशेला खिडकी बनवली तर कधीही संपत्तीची कमतरता जाणवणार नाही.
वास्तुशास्त्रानुसार, खिडक्या बनवताना दिशा लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे जेव्हाही घरात खिडक्या बनवाल तेव्हा घराच्या पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशेलाच बनवा. खिडक्या बनवण्यासाठी या दिशा शुभ मानण्यात आल्या आहेत. दक्षिण दिशेला खिडकी न बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे ही दिशा मृत्यूचा देव यमाची दिशा आहे.
तसेच वास्तुशास्त्रानुसार, खिडक्या कधीही विषम संख्येत बनवायच्या नाहीत. विषम संख्येत खिडक्या बनवल्या तर घरातील सदस्यांवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळेच घरात खिडक्या बनवताना या गोष्टीची विशेष काळजी घ्या की खिडक्या या शक्यतो समसंख्येत अर्थात 2, 4, 8 अशा संख्येतच बनवाव्या.
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या मधोमध कधीही खिडक्या बनवू नये. खिडक्या नेहमी एका रांगेत बनवल्या गेल्या पाहिजेत. मुख्य दाराच्या जवळ खिडकी बनवल्यास आयुष्य सुखकर होतं तसंच कुटुंबाला वैभव आणि यश मिळतं.
टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.