अवास्तव अपेक्षा : तुमच्या जोडीदाराकडून परिपूर्णतेच्या अवास्तव अपेक्षा ठेवणं टाळा. जोडीदाराचं वागणं, स्वभाव आहे तसा स्वीकारून त्याच्या चांगल्या गुणांची, प्रयत्नांची प्रशंसा करा.
मनात राग धरू नका : जोडीदाराकडून भूतकाळात एखादी चूक झाली असेल, तर त्याचा राग मनात न धरता ती चूक माफ करा. मनात राग धरून ठेवल्यानं नातं अधिक दृढ होण्यास बाधा येते.
नकारात्मक संवाद : जोडीदाराशी नकारात्मक संवाद करणं टाळा. टीका करणं, तिरस्कार करणं अशा सवयी सोडून देणं तुमच्या वैवाहिक जीवनासाठी फायद्याचं ठरेल.
निःस्वार्थ भावना : वैवाहिक नात्यामध्ये निःस्वार्थ भावना खूप महत्त्वाची आहे. तुमच्या जोडीदाराच्या गरजा आणि इच्छांचा विचार करून त्या साध्य करण्यासाठी निःस्वार्थ भावनेनं काम करा.
भावनिक आधार : नात्यातील भावनिक अंतर सोडून द्या. जोडीदाराबद्दल सहानुभूती असणं, वेळप्रसंगी जोडीदाराला भावनिक आधार देणं हे तुमचं नातं अधिक दृढ करण्यासाठी गरजेचं आहे.
जोडीदाराबरोबर वेळ घालवण्यास प्राधान्य : तुमच्या वैवाहिक जीवनात नातं अधिक दृढ व विश्वासपूर्ण होण्यासाठी जोडीदाराबरोबर वेळ घालवण्यास प्राधान्य द्या. जोडीदारासोबत चांगलं बाँडिंग निर्माण होण्यासाठी हे उपयुक्त ठरेल.
मनमोकळा संवाद : जोडीदाराशी संवाद साधताना तो मनमोकळा असणं गरजेचं आहे. संवाद साधताना कोणतीही गोष्टी जोडीदारापासून लपवून ठेवू नका. संवादामध्ये प्रामाणिकपणा हा खूप महत्त्वाचा असून, नातं दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी ते गरजेचं आहे.
अहंकार नको : जोडीदाराची नेहमी बरोबरी करण्याचा प्रयत्न किंवा दोघांच्या नात्यामध्ये स्वतःच वर्चस्व असावं, यासाठी केला जाणारा प्रयत्न सोडून द्या. वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी स्वतःचा अहंकार सोडणं खूप महत्त्वाचं आहे.
चुका, उणिवा लक्षात ठेवू नका : वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी पती-पत्नी दोघांनी एकमेकांच्या चुका किंवा उणिवा लक्षात ठेवणं टाळावं. त्याऐवजी, जोडीदाराला क्षमा करणं, समजून घेणं यावर लक्ष केंद्रित करा. नातं दीर्घकाळ कसं टिकेल, याला प्राधान्य द्या.