नवविवाहित जोडप्यांना एकमेकांकडून अनेक अपेक्षा असतात. पण सुरुवातीच्या काळात एकमेकांना योग्य वेळ देता न आल्याने अनेकदा गैरसमज होतात. लव्ह मॅरेजमध्ये असं होत नाही.
कारण लव्ह मॅरेजमध्ये जोडीदार एकमेकांना आधीपासूनच ओळखत असतात. यामुळे अरेंज मॅरेज करणाऱ्या लोकांनी काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला तुम्ही एकमेकांचे चांगले मित्र व्हा. एकमेकांची आवड- निवड जाणून घ्या. सध्या लग्नापूर्वी अनेक गोष्टी कळतात. पण तरीही एकमेकांना पूर्णपणे स्वीकारणं गरजेचं आहे, हे फक्त एकमेकांसोबत राहूनच कळतं.
नातं मजबूत करण्यासाठी सहजता गरजेची आहे. यात दोन्ही पार्टनरला एकमेकांचे मूळ स्वभाव माहीत असणं गरजेचं असतं. आपल्या जोडीदाराच्या भावनांचा सन्मान करा.
सगळ्यांवर बॉलिवूड सिनेमा, मालिका आणि मित्र- मैत्रिणींच्या वैवाहिक जीवनाचा प्रभाव असतो. त्यातही इंटिमेट होताना या सर्वच गोष्टी लक्षात घेतल्या जातात.
अशावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा की, आयुष्य हे काही तीन तासांचा सिनेमा नाही. इथे कोणतीच गोष्टी आधीपासून ठरलेली नसते. नात्याच्या सुरुवातीला पार्टनरकडून अवाजवी अपेक्षा करणं चुकीचं आहे.
तुमच्या जोडीदाराने तुम्हाला समजून घ्यावं अशी जर तुमची अपेक्षा असेल तर तुम्हीही त्यांचे मूड आणि बॉडी लँग्वेज समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकदा तुमच्यात शांतपणे बसून एकमेकांना समजून घेण्याची सवय झाली की, आपोआप नातं मजबूत होईल.