उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराच्या शिखरावरस्थित नागचंद्रेश्वर मंदिराचा दरवाजा वर्षातून एकदाच उघडतो. वर्षभरात फक्त 24 तासांसाठीच या मंदिराची दारं खुली असतात. तो असतो नागपंचमीचा दिवस. परंपरेनुसार, फक्त नागपंचमीलाच मंदिराचे दार भक्तांसाठी खुले करण्यात येते. नागचेंद्रेश्वर मंदिरात शिव-पार्वतीची सुंदर प्रतिमा असून त्याच्याभोवती नागाचा फणा आहे. सातव्या दशकातली ही प्रतिमा नेपाळहून आणून महाकाल मंदिराच्या शिखरावर स्थापित केली आहे. हे मंदिर जमिनीपासून जवळपास 60 फूट उंचीवर आहे. सुरूवातीला या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी काळोख्या वाटेवरून जावे लागे. पूर्वी एकावेळी एकच माणूस या मंदिरात जाऊ शकत होता. काही वर्षांपूर्वी दर्शनासाठी भाविकांची वाढती गर्दी पाहता, मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासनाने लोखंडाचे जिने तयार केले.