लोकांच्या पसंती बदलल्या त्यानुसार बाजारही बदलत गेले. बऱ्याच लोकांना बाजाराने स्वीकारले, त्यांना घडवले. बदलत्या मुंबईचे पडसाद बाजारावरही पडत असतात. गरिबांपासून ते गर्भश्रीमंतांच्या गरजा भागवण्याचे ठिकाण म्हणजे ‘मुंबईतील बाजार’ या बाजारांनी प्रत्येक मुंबईकरांची हौस भागवली आहे.
मुंबईतील प्रसिद्ध अश्या कामाठीपुरा याच भागात दीड गल्ली आहे आणि याच गल्लीमध्ये मुंबईच सिक्रेट मार्केट लागत. याला गुप्त बाजार असेही म्हणतात. कारण सकाळी पहाटे चार वाजताच या रस्त्यावर शेकडो व्यापारी आणि ग्राहक खरेदी-विक्री करताना दिसतात. या बाजारात तुम्ही मूळ किंमती पेक्षा कमी किंमतीत ब्रँडेड वस्तू खरेदी करू शकतात.
कामाठीपुरा मधील दीड गल्लीत हा बाजार शुक्रवारी पहाटे चार वाजता भरतो. पहाटे चार वाजता सुरू होणारा हा बाजार सकाळी आठ वाजता बंद होतो. दीड गल्लीत हा बाजार 1950 मध्ये सुरू झाल्याचे सांगितले जाते. सुरुवातीच्या काळात हा बाजार फक्त शुक्रवारी भरायचा पण आता हा बाजार शुक्रवार आणि गुरुवारी असा दोन दिवस भरतो.
मुंबईच्या आसपासच्या छोट्या कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणात याठिकाणी माल येतो. त्या वस्तू तुम्हाला इथे कमी किंमतीत मिळू शकता. तर व्यापारी काही ब्रँडेड कंपनीकडून सदोष माल खरेदी करतात. तो दुरुस्त करून अर्ध्या किंमतीमध्ये विकला जातो. जिथे स्पोर्ट्स शूजची किंमत बाजारात 8 हजार रुपये असेल, तर ते दीड गल्लीच्या रस्त्यावर सुमारे 1500 रुपयांना उपलब्ध होतात. तर चामड्याचे बूट ज्याची मूळ किंमत 8 हजार रुपये आहे, तेही येथे सुमारे 800 रुपयांना खरेदी करता येतात. तसेच या ठिकाणी चप्पल सुद्धा मिळतात.
शेकडो व्यापारी माल विकण्यासाठी बाजारात येतात. येथे एका दिवसात कोटींचा व्यवसाय होत असल्याचे मानले जाते. लहान शहरातील व्यावसायिक कमी किंमतीत वस्तू खरेदी करण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणावर येतात.