कोरोनाव्हायरसवर (coronavirus) विविध औषधांनी उपचार केले जात आहे. लशींचं क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. प्लाझ्मा थेरेपीचाही वापर करण्यात आला, मात्र प्लाझ्मा थेरेपी फारशी प्रभावी नसल्याचं इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) स्पष्ट केलं आहे. मात्र आता भारतीय शास्त्रज्ञांनी कोरोनाव्हायरसविरोधातील प्रभावी असा उपचार शोधूनच काढला.
अँटिसेरा हे एक ब्लड सीरम आहे. ज्यामध्ये एखाद्या विशेष आजाराविरोधात लढण्याची क्षमता असणाऱ्या अँटिबॉडीजचं (antibody) प्रमाण अधिक असतं. कोणत्याही विशेष संक्रमणाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती लगेच वाढवण्यासाठी माणसांना हे सीरम इंजेक्शनच्या माध्यमातून दिलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे भारतीय शास्त्रज्ञांनी बॅक्टेरिया आणि व्हायरसशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या अँटिबॉडी तयार केल्या आहेत.
कोरोनामुक्त रुग्णांच्या प्लाझ्माचा वापरही असाच केला जातो. मात्र या प्लाझ्मामधील अँटिबॉडीजची पातळी प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी असते. ज्यामुळे त्याचा वापर करताना अडचणी येतात. हे अँटीसेरा कोरोनाव्हायरसवर उपचारासाठी फायद्याचं तर ठरेलच शिवाय कोरोनापासूनही बचाव करण्यासाठीही याचा वापर करता येईल, असा विश्वास आयसीएमआरने व्यक्त केला आहे.