

कोरोना लॉकडाऊनमध्ये प्रत्येकाचं आयुष्य बदललं. आपली धकाधकाची जीवनशैली जणू थांबलीच. आता संथ गतीने का होईना आपण आधीच्या जीवनशैलीच्या मार्गावर येत आहोत.


ऑफिस सुरू झालं आहे, दुकानं-हॉटेल्स उघडलीत. काही कर्मचाऱ्यांना पुन्हा आपल्या कामावर जावं लागत आहे. मात्र एकिकडे कोरोनाची भीती आणि दुसरीकडे लॉकडाऊनमध्ये संथ जीवशैली जगल्यानंतर आता धकाधकीच्या जीवनशैलीशी जुळवून घेऊ का? याची भीती. त्यामुळे आता घराबाहेर पडण्याची हिंमतच होत नाही आहे.


कोरोना लॉकडाऊनमुळे आपल्या मानसिक स्थितीवरही परिणाम झाला आहे. शारीरिकरित्या आपण आता पुन्हा आपलं जुनं आयुष्य जगायला सुरुवात करू मात्र मानसिकरित्या खरंच तयार आहोत का? ही मानसिक तयारी तुम्ही कशी कराल?


कोणतीही गोष्ट करण्यासाठी सर्वात महत्त्वाची असते ती इच्छा आणि प्रेरणा. या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही काहीही करू शकता. त्यामुळे लॉकडाऊननंतर पुन्हा ऑफिसला जाताना तुम्ही ज्या कामासाठी जात आहात, तीच तुमची प्रेरणा असेल. तुम्हाला हे काम करायचं आहे, अशी जिद्द उराशी बाळगून जा. म्हणजे तुम्ही ते कशापद्धतीनेही पूर्ण कराल.


राहिली कोरोनाची भीती तर कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्या. मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा आणि हातांची स्वच्छता राखा. जेणेकरून आपण सुरक्षित असल्याची भावना मनात कायम राहिल.