तुम्हाला शारीरिक संतुलन राखण्यासाठी आणि वजन आटोक्यात ठेवण्यासाठी फक्त जिमच आवश्यक आहे असं नाही. तुम्ही दररोज सकाळी अर्धा तास फिरायला जाऊन सुद्धा आपलं आरोग्य उत्तम ठेऊ शकता.
जर तुम्ही तुमच्या दररोजच्या जीवनशैलीमध्ये 'मॉर्निंग वॉक'ला प्राधान्य दिलं, तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. यामुळे तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहु शकता.
उत्साह वाढतो- तुम्ही जर सकाळी 30 मिनिटं फिरायला गेलात, तर दिवसभर तुमच्यात उत्साह आणि चैतन्य दिसून येतं. एका अभ्यासानुसार घराबाहेर 20 मिनिटं फिरल्यानेही तुमच्यात उत्साह निर्माण होतो. अशामध्ये प्रत्येकाने 30 मिनिटं सकाळी फिरायला जाणं आवश्यक आहे.
हृदय राहतं सुरक्षित- एका अभ्यासानुसार तुम्ही जर 30 मिनिटं सकाळी फिरायला गेलात, तर तुम्ही हृदयाच्या 19 टक्के आजारांपासून स्वतः ला सुरक्षित ठेवता.
स्मरणशक्ती वाढवण्यास होते मदत- तुम्ही जर सकाळी 30 मिनिटं मोकळ्या हवेमध्ये फिरायला गेलात, तर तुमच्या शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो. त्याचबरोबर रक्ताभिसरण सुरळीत होतं आणि स्मरणशक्ती चांगली होते.
चांगली झोप- 2017 च्या एका अभ्यासानुसार 55 ते 65 वयोगटातील लोकांना झोपेचा त्रास होतं असतो. अशात जे लोक सकाळी 30 मिनिटं मोकळ्या हवेत फिरायला जातात. त्यांना उत्तम झोप येत असल्याचं आढळून आलं आहे.
मूड राहतो चांगला- शारीरिक फायद्यांसोबतच सकाळी 30 मिनिटं फिरायला गेल्याने तुमचा मूड देखील चांगला राहतो. तुमचा थकवा, ताण-तणाव दूर होतो. त्यामुळे आठवड्यातील 5 दिवस सकाळी 30 मिनिटं फिरण्याचा सल्ला तज्ञ देतात.
हाडं होतात मजबूत- रोज सकाळी 30 मिनिटं फिरायला गेल्याने हाडे आणि मांसपेशी मजबूत होतात. त्याचबरोबर शरीरातलं चमक, दुखणंसुद्धा नाहीसं होतं. जर तुम्ही ओस्टीयोपोरोसीसने त्रस्त असाल, तर तुम्हाला सकाळी 30 मिनिटांचा वॉक घ्यायलाचं हवा.
रोगप्रतिकारक क्षमता वाढते- जर तुम्ही सकाळी 30 मिनिटं मोकळ्या हवेत फिरायला गेलात, तर शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
वजन कमी होतं- एका अभ्यासानुसार तुम्ही जर अर्धा तास सकाळी फिरायला गेलात, तर तुमच्या 150 कॅलरी बर्न होतात आणि त्यासोबत जर तुम्ही आहारात बदल करून कमी कॅलरी घेतल्या तर तुम्ही अगदी सहज आपलं वजन कमी करू शकता.
साखर राहते नियंत्रणात- हा आजार प्रामुख्याने चुकीच्या जीवनशैलीमुळे जडतो. त्यामुळे आपल्या आहारात बदल करून सकाळी फिरायला जावून, आपली जीवनशैली सक्रीय ठेवली, तर यापासून नक्कीच आराम मिळतो.