सकाळी लवकर उठायचं पाणी भरायचे त्यानंतर घरातलं आवरायचं आणि दुपारी 2 वाजता स्वयंपाक करायला सुरुवात करायची. फक्त एक नाही तर चार प्रकारच्या भाज्या ,आमटी, चिकन ,भात, 40 भाकऱ्या आणि 40 चपात्या इतका मोठा स्वयंपाक 4.30 पर्यंत आटपायचा.
त्यानंतर हे सर्व डबे एका बास्केटमध्ये भरायचे. डब्यांनी भरलेले हे जड बास्केट आपल्या डोक्यावर घ्यायचे आणि थेट टिटवाळा ते भायखळा असा प्रवास करायचा. हे टिटवळ्यात राहणाऱ्या कौशल्या कडू यांचे नित्याचेच काम. कष्ट केल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ही म्हण कौशल्या कडूच्या बाबतीत अगदी लागू पडते.
कौशल्याकडू गेल्या 31 वर्षापासून आपल्या मुलासह राहत आहेत. कष्ट करून त्याने एकट्याने आपल्या मुलाला स्वतःच्या पायावर उभे केले. घरची परिस्थिती तशी नाजूक. त्यामुळे रोजच्या कमाईवर त्यांचे घर चालत असे.
त्यांनी सुरुवातीला घरकाम केलं. त्यानंतर मॉलमध्येही साफ सफाईचे काम केले. वय वाढले तसं मॉलमध्ये काम करण्यासाठी अपात्र ठरले. त्यानंतर पुन्हा घरात बसले. मात्र खचून न जाता काय करता येईल याचा विचार केला.
माझ्या बहिणीने भायखळाच्या रेल्वे हॉस्पिटलजवळ अनेक जण उपाशी असल्याचे सांगितले. त्यानंतर मी स्वतः नाश्ता घेऊन तेथे जाऊ लागले. जशी माझ्या हाताची चव ग्राहकांना आवडली तसे मी जेवण विक्री करायला सुरुवात केली. आता मुलगा मोठा झाल्यानं तो देखील घराला हातभार लावतो, असं कौशल्या यांनी सांगितलं.
घरातून निघताना माझी सून किंवा मुलगा टोपली डोक्यावर ठेवतो. त्यानंतर घरापासून टिटवाळा स्थानकापर्यंत त्या चालत जातात. तिथून प्लॅटफॉर्मला ट्रेन येईपर्यंत त्या टोपली खाली ठेवतात. टोपली खाली ठेवताना पुन्हा डोक्यावर ठेवताना, गाडीत चढताना त्यांना भली माणस मदतीला येतात, असे त्या सांगतात.
भायखळामध्ये अनेक ग्राहक कौशल्या यांची वाट पाहत असतात. स्वस्त दर आणि उत्तम चव असल्यानं कौशल्या यांनी तयार केलेलं जेवण आम्ही नेहमी खातो, अशी भावना ग्राहकांनी व्यक्त केलीय. माझा स्वकष्टावर विश्वास आहे. माझ्याकडून भगवंत ही सेवा करुन घेत आहे. भुकेल्याचं पोट भरतं आणि मला चार पैसे सुटतात, असंही कौशल्या यांनी यावेळी सांगितलं.