कोणताही ऋतू असला तरी आइस्क्रीम आवडीने खाल्लं जातं. सण-समारंभ, कार्यक्रम, पार्टी अशा कोणत्याही समारंभाच्या मेन्यूमध्ये फिट होणारा हा एक पदार्थ आहे. विशेष म्हणजे लहानांबरोबरच मोठ्यांनाही ते आवडतं. त्यामुळेच बाजारात आइस्क्रीम्सचे नावीन्यपूर्ण प्रकार पाहायला मिळतात. आइस्क्रीम म्हणजे गार पदार्थ; पण गरम किंवा तळलेलं आइस्क्रीम कधी पाहिलंय का? बाहेरून गरम आणि आतून गार असणारं फाईड आइस्क्रीम डेझर्ट तमिळनाडूमध्ये मिळतं.
वझुथारेड्डी भागातल्या विलुप्पुरम्स फूड कोर्टात मिळणारी ही डिश सध्या प्रचंड लोकप्रिय झाली आहे. फ्राईड आइस्क्रीम हे एक डेझर्ट असून त्यात आइस्क्रीमचा एक स्कूप एका विशिष्ट आवरणात घालून बंद केला जातो आणि नंतर तेलात तळला जातो. यामुळे हे आइस्क्रीम बाहेरून गरम पण आतून गार असतं.
या ठिकाणी 120 रुपयांमध्ये फाईड आइस्क्रीमचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. त्याशिवाय पिझ्झा, इटालियन व्हाइट सॉस पास्ता, चिकन ग्रेव्ही, बिर्याणी, स्टार्टर्स आणि काही डेझर्ट्सही मिळतात; मात्र ग्राहक आवर्जून फ्राईड आइस्क्रीमची चव घेतात. तसंच हे खाल्लंच पाहिजे असं इतरांनाही सुचवतात.
या आइस्क्रीमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हे आइस्क्रीम कसं तयार केलं जातं, हे त्यात क्रमानुसार दाखवलं आहे. पहिल्यांदा एक स्कूप आइस्क्रीम घेऊन त्याला सर्व बाजूंनी ब्रेडक्रम्स लावले जातात. तयार डेझर्ट 20 मिनिटं फ्रीजरमध्ये ठेवलं जातं. त्यामुळे ते वितळत नाही. त्यानंतर फ्रिजमधून काढून ते तापलेल्या तेलात तळलं जातं. रंग सोनेरी झाला की तेलातून आइस्क्रीम काढलं जातं. त्यावर आवडीचा सॉस घालून सर्व्ह केलं जातं.
चॉकलेट, स्ट्रॉबेरी, व्हॅनिला, ब्लॅक करंट, बटरस्कॉच अशा काही फ्लेवर्समध्ये हे आइस्क्रीम मिळतं. जगभरात आइस्क्रीम्समध्ये खूप नावीन्य आणलं गेलं आहे. आइस्क्रीमचं टेक्श्चर, त्याचा स्वाद यात बदल करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून आता फ्राईड आइस्क्रीमकडे पाहता येईल.