देशभरात सध्या कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. यामध्ये मेड इन इंडिया लस म्हणजे कोवॅक्सिन (Covaxin) लशीचाही समावेश आहे. हैदराबादमधील भारत बायोटेकनं (Bharat Biotech) तयार केलेली ही लस.
काही दिवसांपूर्वीच कोवॅक्सिन लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा अहवाल जारी करण्यात आला आहे. भारत बायोटेकनं याबाबत मोठी माहिती दिली होती.
ज्यांना कोरोना संसर्ग झालेला नाही. त्यांनी या लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोनापासून संरक्षण देण्यात ही लस 81 टक्के प्रभावी ठरली आहे, असं कंपनीनं सांगितलं आहे.
आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्सनंतर इतर नागरिकांनाही लस उपलब्ध होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्याच दिवशी ही लस घेतली आणि नागरिकांनादेखील लस घेण्याचं आवाहन केलं.
दरम्यान लसीकरण सुरू असताना आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा अहवाल जारी झाल्यानंतर आता या लशीबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
औषध नियामक मंडळाच्या तज्ज्ञ समितीनं कोवॅक्सिनच्या आपात्कालीन वापराला मंजुरी दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा अंतरिम अहवाल समितीनं मंजूर केला आहे. ही लस आता क्लिनिकल ट्रायल मोडमध्ये नाही असं जाहीर करण्यात आलं आहे.
मेड इन इंडिया लशीला परदेशातूनही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. इतर देशांना लशीचा पुरवठा कऱण्यासाठीदेखील आपण प्रयत्नशील असल्याचंही कंपनीनं सांगितलं आहे.