ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी ब्लूबेरी, लिंबूवर्गीय फळं, चॉकलेट्स आदींचा समावेश आहे. याशिवाय अन्यही काही पदार्थ यासाठी उपयुक्त ठरू शकतात. त्याबाबतची माहिती जाणून घेऊया. `डीएनए इंडिया`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे.
डायबेटीस आजारात रुग्णांची ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहणं आवश्यक असतं. यामुळे अन्य आजार होण्याचा धोका कमी होतो. ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश गरजेचा आहे.
डायबेटीस असलेल्या रुग्णांसाठी सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्सच्या ऐवजी ऑलिव्ह ऑइल हे आरोग्यदायी अनसॅच्युरेटेड फॅट्स असलेलं तेल वापरण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, डायबेटीस टाइप-2 असलेल्या रुग्णांच्या आरोग्यात या फॅटचा प्रकार अधिक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
रोजच्या आहारात ब्लूबेरीचा समावेश केल्यास कार्बोहायड्रेटस मिळू शकतात. ब्लूबेरी किंवा बेरीज नियमित खाल्ल्याने इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते, असं संशोधनातून दिसून आलं आहे.
हरभरा, शेंगावर्गीय भाज्या आणि मसूर यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे डायबेटीसच्या रुग्णांसाठी हे सर्वोत्तम पर्याय आहेत. शेंगावर्गीय भाज्या खाल्ल्याने रुग्णांना ब्लड शुगर लेव्हलमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो.
संत्री, द्राक्षं, मोसंबी यांसारख्या लिंबूवर्गीय फळांचा आहारात समावेश असणं गरजेचं आहे. कारण यामुळे ब्लड शुगर आणि कोलेस्टेरॉल लेव्हलवर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम दिसतो, असं संशोधनातून दिसून आलं आहे.
डायबेटीसच्या रुग्णांनी अगदी थोड्या प्रमाणात रोज दर्जेदार डार्क चॉकलेट खाल्ल्यास त्यांच्या फास्टिंग इन्सुलिन लेव्हल आणि ब्लड प्रेशर कमी होते, असं काही संशोधनातून दिसून आलं आहे.
डायबेटीसच्या रुग्णांसाठी काही मसाल्याचे पदार्थही गुणकारी ठरू शकतात. दालचिनी आहारात समाविष्ट केल्यास इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवते आणि त्यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते.
दर आठवड्याला बदाम आणि नट बटरचा आहारात समावेश केला तर डायबेटीस टाइप-2 असलेल्या महिलांचा हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.