

एक मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांसाठीही कोरोना लस उपलब्ध झाली आहे. मग लसीकरणासाठी सरकारनं एक वेळ निश्चित केली होती. या वेळेतच लस दिली जात होती. पण आता वेळेची मर्यादा सरकारनं हटवली आहे.


आतापर्यंत सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत लस घेता येत होती. पण आता तुम्हाला 24 तास कधीही लस घेता येणार आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मोदी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. सरकारी आणि खासगी लसीकरण केंद्रातही तुम्हाला तुमच्या वेळेनुसार कधीही लस घेता येईल.


आता 24x7 आपल्या सुविधेनुसार लस घेऊ शकता, असं ट्वीट केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केलं आहे. पंतप्रधान मोदींना देशातील नागरिकांच्या आरोग्यनुसार त्यांच्या वेळेचं महत्त्वही माहिती आहे, असं ते म्हणाले.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत देशभरात 1.54 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. लसीकरणाच्या 46 व्या दिवशी म्हणजे मंगळवारी एका दिवसात 6,09,845 लोकांचं लसीकरण झालं. त्यापैकी 5,21,101 लोकांना पहिला डोस तर 88,744 लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.


16 जानेवारी, 2021 पासून देशात कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली. जानेवारीत आरोग्य कर्मचारी, फेब्रुवारीत फ्रंटलाइन वर्कर्स आणि मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांचंही लसीकरण सुरू झालं. यामध्ये 60 पेक्षा जास्त वयाचे म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि 45 पेक्षा जास्त वयाचे इतर आजार असलेल्या लोकांचा समावेश आहे.