स्वयंपाक करताना कित्येक महिलांना कधी ना कधी किरकोळ चटका लागतो. लहान मुलं खेळता खेळता एखाद्या गरम भांड्याला, गरम वस्तूला स्पर्श करतात. मोठ्या व्यक्तींचाही नकळत अशा गरम वस्तूंना स्पर्श होतो किंवा कधीतरी एखादा गरम पदार्थ, गरम पेय अंगावर सांडतं. यामुळे भाजल्याची जखम किरकोळ असली तरी योग्य वेळी उपचार न केल्यास ती अधिक गंभीर होऊन घातकदेखील ठरू शकते.
भाजलेल्या जखमांवरील उपचार हे व्यक्ती-व्यक्तीमध्ये भिन्न असू शकतात. इजा किती गंभीर आहे यावर हे अवलंबून असतं. यामध्ये फर्स्ट डिग्री बर्न, सेकंड डिग्री बर्न आणि थर्ड डिग्री बर्न पहायला मिळते. फर्स्ट डिग्री बर्नमध्ये सनबर्नचा समावेश आहे. सेकंड डिग्री बर्न गंभीर असू शकते आणि वेदना, लालसरपणा, सूज आणि फोड येणं यांचा समावेश असतो आणि थर्ड डिग्री बर्न हा जीवघेणा ठरू शकते.
मुलं आणि वृद्धांमध्ये या दुखापती अधिक गुंतागुंतीच्या ठरू शकतात. मधुमेह, केमोथेरपी, गर्भधारणा, थायरॉईड डिसऑर्डर, लठ्ठपणा, मूत्रपिंडाचे आजार यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याने भाजल्याच्या जखमा अधिक वेदनादायक आणि गंभीर स्वरुपाच्या ठरू शकतात. शरीरावर पाच टक्क्यांपेक्षा जास्त आकाराचे कोणत्याही प्रकारचे भाजल्या त्वरित आपत्कालीन कक्षात दाखल करावं, असा सल्ला मुंबईतील वोक्हार्ट रुग्णालयातील सल्लागार प्लॅस्टिक अँड रिकन्स्ट्रक्टीव्ह सर्जन डॉ, श्रद्धा देशपांडे यांनी दिला आहे.
सायलेन्सर बर्न्स सारख्या अत्यंत गरम वस्तूंशी संपर्क झाल्यामुळे किरकोळ भाजल्याच्या घटना या सर्वसामान्य तरी त्यावरही योग्य आणि वेळीच उपचार करणे फायदेशीर ठरतं. यामध्ये टूथपेस्ट, बटाट्याची साल, गव्हाचं पीठ, तांदळाचं पाणी, शाई, हळद लावणं अशा उपचारांचा समावेश असतो. मात्र हे उपचार काही हानी देखील पोहोचवू शकतात.
भाजलेल्या जखमांवर प्रामुख्याने थंडाव्याची गरज असते. भाजलेल्या त्वचेवरील भागाला कमी कमी 20 मिनिटांसाठी थंड पाण्याखाली ठेवणं गरजेचं आहे. किरकोळ बर्न्ससाठी कोणत्याही अँटीसेप्टिक क्रिमचा वापर करा जेणेकरून जखमेद्वारे होणारा संसर्ग टाळता येईल.
जर 5 टक्क्यांपेक्षा जास्त भाजलं असेल तर डॉक्टरांकडे जाणं चांगलं आहे जेणेकरून जखम किती खोल आहे याचं अचूक मूल्यांकन करून त्यानुसार त्याचे उपचार करता येऊ शकतात. निर्जंतुकीकरण आणि ड्रेसिंगद्वारे ताबडतोब नियंत्रित केल्यास जखम लवकर बरी होण्यास मदत होतो.
बहुतेक रुग्ण नंतरच्या टप्प्यात डॉक्टरकडे जातात जेव्हा जखमेला संसर्ग पसरण्यात सुरुवात होते. मग त्यावर योग्य तोंडावाटे घेण्यात येणारी औषधं आणि विशेष ड्रेसिंग केली जाते. आधुनिक औषधाने कृत्रिम त्वचेचा उपयोग करून जखमांना वेदनारहित आणि डाग नसलेली त्वचा मिळवून देते. योग्य प्रकारे उपचार केले तर खोलवर झालेल्या जखमा देखील बरे होऊ शकतात.