कोरोनाव्हायरसची लागण झाली की त्या व्यक्तीच्या शरीरात व्हायरसविरोधात अँटिबॉडीज तयार होतात. या अँटिबॉडीज व्हायरसशी लढा देतात.
मात्र आता नव्या संशोधनानुसार काही कोरोना रुग्णांच्या शरीरात अशा अँटिबॉडीज तयार होत आहेत ज्या व्हायरसऐवजी शरीरावरच हल्ला करत आहेत.
कोरोनाव्हायरस झालेल्या रुग्णांमध्ये ऑटोअँटिबॉडीज तयार होऊ लागल्या आहेत. ज्या व्हायरसऐवजी मानवी शरीरातील पेशींवर हल्ला करत आहेत.
न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार जॉर्जियातील इमोरी युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. अद्याप हे संशोधन जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही.
काही कोरोना रुग्णांचा रिपोर्ट नेगेटिव्ह आल्यानंतरही त्यांच्यामध्ये समस्या दिसून येत आहेत. याला दीर्घकालीन म्हणजे अधिक कालावधी राहणारा कोव्हिड 19 म्हटलं जातं. तज्ज्ञांच्या मते यामागे ऑटोअँटिबॉडीज हे एक कारण असू शकतं.