ठाणे, 01 डिसेंबर : महाराष्ट्रात आता कोरोनानंतर गोवर थैमान घालू लागला आहे. मुंबईत गोवरचे सर्वाधिक रुग्ण असताना मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातही गोवर थैमान घालतो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात गोवरच्या रुग्णांनी शंभरचा आकडा पार केला आहे. शंभरपेक्षा जास्त गोवरचे रुग्ण आहेत. जिल्ह्यात गोवरमुळे 5 बळी गेले आहेत. आता कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला असतानाच आता गोवरने डोकं वर काढलं आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 724 रुग्णांची नोंद आहे. सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. मुंबई महापालिकेच्या 01 डिसेंबर रोजीच्या आकडेवारीनुसार मुंबईतील गोवर रुग्णांची संख्या 346 आहे. मुंबईप्रमाणे ठाण्यातही गोवर वेगाने हातपाय पसरतो आहे. जिल्ह्यात आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. 5 मृतांपैकी 2 ठाण्यातील आहे. 22 नोव्हेंबरला शिळ गावात साडेसहा वर्षीय मुलीची मृत्यू झाला होता. तर आता मुंब्रामध्ये दीड वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. हे वाचा - Shocking! वजन घटवण्याच्या नादात असा उपाय पडला भारी; फुटली महिलेची किडनी आत्तापर्यंत गोवरचे जे रुग्ण आढळून आले आहेत यात बहुतांश जणांचं लसीकरण पूर्ण झालेलं नसल्याचं दिसून आलं आहे. राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. चिंताजनक बाब म्हणजे गोवर हा आजार कोविडपेक्षाही 4 पट वेगाने संसर्ग होणारा आजार आहे. गोवरची लक्षणं - गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. यात खोकला, सर्दी, ताप, डोळ्यांची जळजळ होणं, डोळे लाल होणं, घसा दुखणं, तोंडाच्या आतील बाजूस पांढऱ्या रंगाचे स्पॉट, अशक्तपणा, अंगदुखी ही लक्षणं दिसतात. गोवर प्रतिबंधात्मक उपाय - बालकांना लस वेळेवर द्या गोवर रुग्णाच्या संपर्कात जाणं टाळा संपर्कात आल्यास हात स्वच्छ धुवावेत दूषित हातांचा स्पर्श तोंड, डोळ्यांना होऊ देऊ नका